त्यांच्यापेक्षा वेश्या परवडली, मुंबईतील त्या युतीचा प्रश्न अन् संजय राऊत कडाडले
महापालिका निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिंदे गटाशी युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावत भाजपवर सडकून टीका केली आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणि महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी युती करण्याच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. आम्ही कोणासमोरही लाचार होणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी ठणकावून सांगितले.
आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाची मदत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टपणे उत्तर दिले. एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही याबद्दल पक्ष प्रमुख आणि पक्ष निर्णय घेतील. यापुढे काय करायचे हे पक्ष ठरवेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर अद्याप इतके वाईट दिवस आलेले नाहीत. केवळ सत्तेत बसण्यासाठी आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसून येते
संजय राऊत यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावरही कडक शब्दांत टीका केली. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही. भाजपला सत्तेची जी हाव सुटलेली आहे, ती आज संपूर्ण महाराष्ट्राला दिसतेय. ज्या पद्धतीने त्यांनी पैशांचा अफाट वापर करून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या, त्यावरून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसून येते, असे संजय राऊत म्हणाले.
तो बाळासाहेबांचा विचार नक्कीच नव्हता
संजय राऊत यांनी यावेळी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला. आज जे राजकारण सुरू आहे, तो बाळासाहेबांचा विचार नक्कीच नव्हता. जेव्हा बाळासाहेबांना या भ्रष्ट राजकारणाची घृणा वाटू लागली, तेव्हा त्यांनी अत्यंत परखड भाषेत आपली नाराजी व्यक्त केली होती. यांच्यापेक्षा वेश्या परवडली असे विधान त्यांनी केले होते आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. आजची स्थिती पाहता बाळासाहेबांच्या त्या शब्दांची आठवण येते,” असे संजय राऊत म्हणाले.
या विधानानंतर आता महापालिकांच्या राजकारणात शिवसेना आपली वेगळी चूल मांडणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
