
NCP Reunion: राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या अकाली एक्झिटने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुधवारी भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले. पवार कुटुंबियांवर दुखवटा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान घाडमोडी घडत आहेत. काल राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या बंगल्यावर भेट घेतली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं आणि राष्ट्रवादीची खाती पक्षाकडंच ठेवायची असा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत. पण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा तापल्यानेच घाईघाईत हा शपथविधी करण्यात येत असल्याची चर्चा ही राजकीय गोटात होत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाल्याची चर्चाही सुरू झाल्या आहेत.
शुक्रवारी वेगवान घडामोडी
बुधवारी अजितदादांचे भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी शुक्रवारी मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. वर्षा बंगल्यावर सव्वातास या मंत्र्यांनी चर्चा केली. सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी समोर आलं. आज सुनेत्रा पवार संध्याकाळी राजभवनावर संध्याकाळी 5 वाजता शपथ घेतील. तर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या नावाची निवड होण्याची दाट शक्यता आहे. राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे. त्यांचीही तशीची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा मागे?
दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. तर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात याविषयीची सकारात्मक चर्चा झाली. 12 तारखेला याविषयीची घोषणा पण होणार होती असा गौप्यस्फोट त्यांनी केला. पण आता ही चर्चा खंडित झाल्याचे पवारांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षात सुसंवाद सुरू होता असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग घेतला होता. अजितदादांची तशी इच्छा होती. पण अजितदादांच्या अकाली एक्झिटने या चर्चांना खीळ बसली.
शपथविधीची घाई का?
तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत 17 जानेवारी रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली होती अशी माहिती समोर येत आहे. 12 फेब्रुवारी रोजी राज्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची बातमी देण्यात येणार होती. त्यापूर्वीच भीषण विमान अपघाताने मोठा आघात झाला. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती काही नेत्यांना वाटत असल्यानेच त्यांनी घाईघाईत शपथविधीचा मुद्दा पुढे रेटल्याची चर्चाही राजकीय गोटात सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये असे काही नेत्यांना वाटत असल्याचेही यामुळे समोर येत आहे. अर्थात भविष्याच्या उदरात काय दडलंय हे लवकरच समोर येईल.