Sharad Pawar : अनेकांच्या पोटात वेदना, अनेकांची झोप उडाली… शरद पवार यांनी पहिल्यांदाच वापरले असे शब्द; आघाडीत ‘राज’ पर्व?
Uddhav Thackeray-Raj Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. काँग्रेसच्या गोटातून विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले. त्यानंतर नागपूरमध्ये शरद पवारांनी सुद्धा याविषयीचे संकेत दिल्याने आघाडीत राज पर्व सुरू होणार का? याची चर्चा रंगली आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी आता शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत राज पर्व सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. थोड्यावेळी पूर्वी काँग्रेसच्या गोटातूनही तसेच संकेत मिळाले. विजय वडेट्टीवार यांनी दोघांच्या एकत्र येण्याविषयी आशावाद व्यक्त केला. तर खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्र येण्याने काही अडचण होणार नसल्याचे संकेत दिले. त्यातच शरद पवार यांनी आज जी बॅटिंग केली, त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आघाडीत ‘राज’ पर्व?
‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी थेट मातोश्रीवर जात राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला शह-कटशाह देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे सेनेला हादरा देण्यासाठी ही युती होत असल्याची चर्चा होत आहे. त्यातच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे सहकुटुंब राहुल गांधींच्या भेटीला गेले. त्यात 35 मिनिटं महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतंत्र चर्चा झाली. त्यात राज ठाकरे यांचा विषय सुद्धा चर्चिल्या गेल्याचे समोर आले. खासदार संजय राऊतांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला.
अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा
शरद पवार यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर स्पष्ट भूमिका मांडली. राज ठाकरे काय भूमिका घेतात. दोन भाऊ काय निर्णय घेतात. दोन्ही भावांना एकत्र येऊन द्या. अनेकांच्या पोटात वेदना होत आहे ते होऊ द्या, असा बजरंग टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला. ते एकत्र आले तर अनेकांची झोप उडाली आहे. ते एकत्र आले तर आम्हाला आनंदच वाटेल. अगोदर त्यांना एकत्र येऊ द्या. मग आम्ही निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले. अजून याविषयीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत राज ठाकरे आल्यास कोणाला अडचण होण्याचे चित्र दिसत नसल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.
