वाडिया रुग्णालयाला आजच्या आज 22 कोटी रुपयांचे अनुदान देणार

वाडिया रुग्णालयाला आजच्या आज 22 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचे आदेश मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

वाडिया रुग्णालयाला आजच्या आज 22 कोटी रुपयांचे अनुदान देणार

मुंबई : वाडिया रुग्णालयाला (Wadia Hospital) आजच्या आज 22 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचे आदेश मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.  स्थायी अध्यक्षांच्या या निर्देशानंतर आजच अनुदान देण्याचं प्रशासनाकडून मान्य करण्यात आलं आहे.  वाडिया रुग्णालय (Wadia Hospital) प्रशासनाने राज्य सरकार आणि पालिकेकडून मिळणारे अनुदान थकल्याचं कारण देत, दोन्ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाविरोधात राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी घेतला आहे. तर जमीन लाटण्यासाठी रुग्णालय बंद करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातल्याच आरोप भाजपने केला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या तातडीच्या बैठकीत, तत्परतेने वाडिया रुग्णालयासाठी 22 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिकेकडून 135 कोटीचे अनुदान थकीत असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र महापालिकेच्या दाव्यानुसार केवळ 20 कोटीचेच देणं बाकी आहे. पालिका प्रशासनाने रुग्णालयाचा दावा फेटाळत, फक्त 21 ते 22 कोटीच देणे बाकी असल्याचं स्पष्ट केलं. वाडिया प्रशासन वाढीव बेड आणि वाढीव कर्मचाऱ्यांनुसार अनुदान मागत आहेत. मात्र हे देणं शक्य नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

वाडिया रुग्णालय

मुंबईतील परळ इथं जेरबाई वाडिया रुग्णालय आहे. बाल रुग्णालय आणि प्रसुती रुग्णालय अशी दोन रुग्णालये आहेत. मात्र महापालिकेने तीन महिन्यांचे जवळपास 98 कोटींचे अनुदान थकवल्याने, ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याची प्रक्रिया रुग्णालय प्रशासनाने सुरु केली. त्याविरोधात मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आवाज उठवून, रुग्णालय बंद पाडण्याचा घाट हाणून पाडण्याचा इशारा दिला.

वाडिया रुग्णालय हे लहान मुलांसाठी प्रसिद्ध आहे. या रुग्णालयाची 40 टक्के जागा पालिकेची असून रुग्णालय चालवण्यासाठी पालिकेकडून अनुदान दिले जाते. मात्र जागा आणि निधी पालिकेकडून दिली जात असतानाही रुग्णालय खासगी पद्धतीनेच चालवले जाते. निधी देऊनही रुग्णांना तशाप्रकारे  सेवा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेला चालवण्यासाठी द्यावे असे पालिकेचे म्हणणे आहे.

पालिका आणि वाडिया यांच्या वादात पालिकेकडून दिला जाणारे अनुदान मागील तीन महिन्यांपासून लटकले आहे. निधी अभावी रुग्णालयाच्या सेवा – सुविधांवर ताण येत असल्याने यापुढे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. शिवाय जे रुग्ण अॅडमिट आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती.

पालिका – वाडिया रुग्णालयाच्या  वादात लहान मुलांसाठी एकमेव असलेले हे रुग्णालय निधी अभावी बंद करण्याचा घाट घातला जातो आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. या रुग्णालयाची निम्मी जागा पालिकेची असून अनुदानही पालिका देते. शिवाय ट्रस्टीच्या बोर्डवर चार नगसेवक आहेत. असे असताना सेवा मात्र खासगी स्वरुपात दिल्या जातात. त्यामुळे पालिकेलाच हे रुग्णालय चालवण्यास का दिले जात नाही असा सवाल नगरसेविका राजूल पटेल यांनी विचारला.

Published On - 4:27 pm, Tue, 14 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI