शिवसेना उबाठा-मनसे एकत्र येण्याचा राजकीय निर्णय कधी? संजय राऊत यांनी दिले उत्तर
सरकार आणि सरकारची माणसे यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे. त्यामुळे मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांची तुलना पहलगाम दहशतवाद्याशी करत आहेत, अशी टीका शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातील जनता २० वर्ष ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या क्षणाची वाट पाहत होती. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे महत्वाचे होते. योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात. हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यामुळे काही जणांनी धसका घेतला आहे. ते दोन्ही नेते एकत्र कसे येतात, हे पाहू, असे म्हटले जात आहे. सरकार आणि सरकारची माणसे यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहे. काही जण मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांची तुलना पहलगाम दहशतवाद्याशी करत आहे, अशी टीका शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात राजकीय निर्णय लवकरच होईल, असा आपला विश्वास आहे, त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही पक्षांत उत्साह
राज ठाकरे यांनी मेळाव्यात राजकीय भूमिका मांडली नाही, केवळ उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उबाठाकडून मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केला आहे, तो कायम आहे. आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहिली आहे. राज ठाकरे आणि मनसेची देखील तिच भूमिका आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची भूमिका लवकर जाहीर होईल, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेस का आले नाही?
मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्र आल्यावर काँग्रेस सोबत येणार नाही? यावर प्रश्नावर राऊत म्हणाले, काँग्रेस मराठीपासून दूर जाणार आहे का? मराठीच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षसुद्धा एक आहेत. काँग्रेसला दिल्लीतून मेळाव्यास जाऊ नये, यासंदर्भात काहीच आदेश दिले नाही. त्यासंदर्भात आमची काँग्रेससोबत चर्चा झाली. त्यांच्या काही महत्वाच्या बैठका होत्या. त्यामुळे काँग्रेसचे नेते मेळाव्यास आले नाही, असे राऊत यांनी सांगितले.
कोणताही अहवाल आणि समिती आम्ही हिंदी सक्तीचा मुद्दा मान्य करणार नाही. त्यासंदर्भातील कोणताही अहवाल सरकारलासुद्धा स्वीकारता येणार नाही. नरेंद्र जाधव मराठी व्यक्ती आणि तज्ज्ञ आहेत. त्यांना मराठीचा अभिमान असणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.
