विद्यार्थिनींकडून शौचालयाची स्वच्छता, पालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

शालेय विद्यार्थ्यांकडून शाळेतील शौचालय आणि इतर ठिकाणांची साफसफाई करुन घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे.

विद्यार्थिनींकडून शौचालयाची स्वच्छता, पालिका शाळेतील धक्कादायक प्रकार

कल्याण : शालेय विद्यार्थ्यांकडून शाळेतील शौचालय आणि इतर ठिकाणांची साफसफाई करुन घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. डोंबिवलीत एका शाळेतील विद्यार्थ्यांकडून शौचालयाची साफसफाई करुन घेतली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला. यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी ही घटना निंदनीय असून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात महापालिकेच्या हिंदी आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळा एकाच इमारतीत भरतात.

हेही वाचा : काचेच्या भिंती, झिरो एनर्जी खोल्या, झेडपीच्या ‘या’ शाळेत प्रवेशासाठी 4 हजार विद्यार्थी वेटिंगवर

या शाळेत समाजसेविका सुजाता चव्हाण या काही कामानिमित्त गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शाळेतील काही शाळकरी विद्यार्थिनी शौचालयाची स्वच्छता करत असल्याचं त्यांनी पाहिलं. शौचालयाची साफसफाई करताना या विद्यार्थिनींचे कपडे पूर्णपणे भिजले होते. हा प्रकार पाहून सुजाता चव्हाण यांना धक्का बसला.

सुजाता चव्हाण यांनी लगेच या घटनेचा व्हिडीओ काढला. तसेच, त्यांनी शाळेत जाऊन या प्रकरणी विचारपूस केली. तेव्हा शाळा व्यवस्थापनाने कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

आठ वर्षांपासून स्वच्छता कामगार आणि मदतनीस नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षक स्वत: स्वच्छता करतात, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिली. यासंदर्भात समाजसेविका सुजाता चव्हाण यांच्यासह नंदा वास्के, सरिता मोरे यांनी केडीएमसी उपायुक्त मिलिंद धाट यांच्याकडे तक्रार केली.

“ही बाब अत्यंत गंभीर आहे. लहान विद्यार्थिनींकडून साफसफाई करवून घेणे, हे निंदनीय आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल”, अशी माहिती केडीएमसीचे उपायुक्त मिलींद धाट यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शिक्षणाची व्यवस्था नाही. आरोग्याची दुरावस्था आहे. रस्ते नीट नाहीत. त्यामुळे प्रशासन आणि महापालिका नेमकं काय काम करते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

हत्तीरोगाची गोळी खाऊन विद्यार्थी वर्गातच बेशुद्ध, शिक्षक कुलूप लावून घरी

पुणे झेडपीत ‘ऑन टाईम’ कर्मचाऱ्यांना गुलाब, लेटलतिफांसाठी तीन नियम

‘शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा करा’

पाहा व्हिडीओ :

Published On - 11:19 pm, Fri, 6 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI