मनसे दणका, ‘… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राईम टाईम मिळणार!

  • Sachin Patil
  • Published On - 18:03 PM, 10 Nov 2018
मनसे दणका, '... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम मिळणार!

कल्याण : आणि डॉ काशिनाथ घाणेकर या मराठी सिनेमाला अत्यंत कमी शो दिल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर कल्याणमधील सिनेमॅक्स मल्टीप्लेक्सने उद्यापासून शोची संख्या वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. सिनेमाला योग्य शो न मिळाल्यास थिएटर फोडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी पीव्हीआर आणि सिनेमॅक्सला याबाबतचा इशारा दिला.

“आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईम टाईम शो न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडून टाकू”, असा थेट इशारा कौस्तुभ देसाई यांनी दिला. कौस्तुभ देसाई यांनी पीव्हीआर कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

यामध्ये कौस्तुभ देसाई हे थिएटरचालकांना डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाचा शो प्राईम टाईमला का नाही असा जाब विचारत आहेत. जर या सिनेमाला प्राईम टाईमची वेळ मिळाली नाही, तर थिएटर फोडू, अशी थेट धमकी त्यांनी दिली. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय मराठी सिनेमाला प्राईम टाईमची वेळ मिळत का नाही, असा सवाल कौस्तुभ देसाई यांनी विचारला आहे.

ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाचे किती तिकीट गेले? प्रेक्षकांची पसंती मराठी सिनेमाला असूनही त्या सिनेमाला प्राईम टाईम का नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती कौस्तुभ देसाई यांनी केली.

मनसेने सरळ भाषेत सांगितलेलं कळत नाही. मागील वेळेस खाद्यपदार्थाबाबत कोर्टाने ऑर्ड दिली होती, तरीही ती थिएटरवाल्यांनी पाळली नाही, आताही मराठी सिनेमाला स्थान नाही, त्यामुळे आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागतं, असं कौस्तुभ देसाई म्हणाले.

कल्याणमधील सिनेमॅक्स थिएटरमध्ये ‘आणि काशिनाथ घाणेकर’चा फक्त एक शो तोही दुपारी तीन वाजता असल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होतोय. तर, ‘ठग्ज..’ ला आठ शो देण्यात आले आहेत. कल्याणमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात. मराठी चित्रपट चांगली कमाई करत असतानादेखील चित्रपटाला प्राईम टाईम न दिल्यामुळे प्रेक्षकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मराठी सिनेमाला प्राईम टाईम न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला होता. अखेर सिनेमॅक्स मल्टिप्लेक्सने पत्र देत रविवारपासून ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाच्या शोची संख्या वाढवणार असल्याचं आश्वासन दिलं.

ठग्स विरुद्ध काशिनाथ घाणेकर

दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने हिंदीत आमिर –अमिताभ स्टारर बिग बजेट सिनेमा ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां‘ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यासोबतच सुबोध भावे स्टारर मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ हा सिनेमाही रिलीज झाला. आता बहुचर्चित 240 कोटींचं बजेट असणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘ठग्ज ऑफ हिन्दोस्तां’ आणि मराठमोळा ‘काशीनाथ घाणेकर’ सिनेमामध्ये स्पर्धा रंगणार हे तर जाहीर होतं.