उद्धव-राज भेटीनंतर मुंबईत मोठ्या घडामोडी; आता ज्युनिअर ठाकरे एकाच मंचावर, काय मोठे संकेत
Uddhav-Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर जात शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर दोन ज्युनिअर ठाकरे हे सुद्धा आज एकाच मंचावर येत आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आज मुंबईत मोठी घडामोडी घडली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्री गाठत शुभेच्छा दिल्या. गुलाबांचा पुष्पगुच्छ देत त्यांनी मनोमिलनाचे स्पष्ट संकेत दिले. तर दुसरीकडे आदित्य आणि अमित ही ठाकरेंच्या नव्या पिढीतील नेतृत्व सुद्धा आजच एका मंचावर येणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची आज त्यामुळेच जोरदार चर्चा रंगली आहे.
अनेक नेत्यांची दुपारची उडाली झोप
आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाल्याचे समोर येत आहे. तर या भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीमुळे आज रविवारी, राज्यातील अनेक नेत्यांची दुपारची झोप उडाली आहे. अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाल्याचे संकेत सातत्याने मिळत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची चर्चा रंगली आहे.
आता ज्युनिअर ठाकरे एकत्र
सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर एकत्र आल्यानंतर आता ज्युनिअर ठाकरे सुद्धा एकत्र येणार आहे. वरळीत एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र येणार आहेत. वरळीच्या राजाचे पाद्यपूजन कार्यक्रमाला दोन्ही ज्युनिअर ठाकरे उपस्थित असतील. त्यामुळे ठाकरेंच्या पुढील पिढीतही मनोमिलन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर समारोपावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र येत सर्वांना अभिवादन केले होते. त्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली. दोघांनी गळाभेट घेतली. एकत्र हात उंचावले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी काका-पुतण्याची आणि भावा-भावांची मंचावर घालून दिलेली भेटही त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. आजच्या मुंबईतील घडामोडींमुळे राजकारणात नवीन बदलाची नांदी आल्याचे दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीची या राजकीय घडामोडी मोठ्या पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
