मोठी बातमी! केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी समोर येत आहे. केडीएमसी फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. केडीएमसी फेरीवाला पथक प्रमुखाचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी प्रत्येक फेरीवाल्याकडून ५०० ते १००० रुपये घेतले जात असून, पूर्ण प्रभागात दिवसाला एक लाखाची वसुली होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात व्हिडिओ आणि राष्ट्र कल्याण पार्टीकडून लेखी तक्रार मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवत कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा (KDMC) फेरीवाला पथक प्रमुख भगवान पाटील यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार ४ ‘जे’ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात घडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भगवान पाटील हे अवैध फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप असून, तातडीने त्यांच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान पाटील हे प्रत्येक फेरीवाल्याकडून ५०० ते १००० रुपये घेऊन त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देत होते. यात काही प्रभाग अधिकारी देखील सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे कल्याण डोंबिवलीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून, महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल प्रकाश काटकर यांनी KDMC आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, भगवान पाटील आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तर या संपूर्ण प्रकारावर KDMC चे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” असं गोडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान महापालिकाला कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
