कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप, तर मालेगावात इस्लाम, आतापर्यंत इतके नगरसेवक आले निवडून
Municipal Corporation Election : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली. त्यानंतर आज निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्जांची छानणी करण्यात आली. यात अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले
मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 6 (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाली आहे. समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय झाला. मालेगावात इस्लाम पार्टीचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे. या विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ‘मालेगाव मनपात आमच्याच इस्लाम पार्टीचे बहुमत येईल आणि पूर्ण बहुमताने आमचाच महापौर असेल’ असा विश्वास यावेळी इस्लाम पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे.
धुळ्यात भाजपचे 2 उमेदवारा बिनविरोध
धुळे महापालिका निवडणूकीत भाजपने 2 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे. प्रभाग क्रमांक सहा ब मधून भाजपच्या ज्योत्सना प्रफुल्ल पाटील बिनविरोध विजयी झाल्या आहेत. विरोधी उमेदवारांचे अर्ज नसल्याने ज्योत्सना पाटील यांचा विजय झाला आहे. याआधीही धुळ्यातील भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे.
कल्याण डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध
कल्याण डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. कल्याण पूर्व येथील 18 मधून रेखा चौधरी, डोंबिवली पॅनल क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे आणि 26 ब मधून रंजना पेणकर हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. रेखा चौधरी यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. आता या तिन्ही विजयी उमेदवारांचे भाजपकडून अभिनंदन केले जात आहे.
