
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड वाद सुरू होता. भाजपने या जागेवर दावा केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीत या जागेवरील उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता. त्यावरूनही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतून श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवतील असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचं स्पष्ट झालं होतं. नंतर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने कल्याण-डोंबिवलीतील वाद निवळल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आज शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी वेगळंच विधान करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना हजेरी लावण्यासाठी श्रीकांत शिंदे डोंबिवलीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या उमेदवारीवरून भाष्य केलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी उमेदवारी ऑफिशियली जाहीर केलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांच्या घोषणेचं मी स्वागत करतो, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एका कुटुंबापुरता मर्यादित पक्ष नाही. सर्वांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांच्याबरोबरचे माझीही उमेदवारी जाहीर होईल. श्रीकांत शिंदे काही स्पेशल नाही. बाकी पक्षांमध्ये आपल्या परिवाराचे नाव पहिल्या यादीत असते. मात्र, एकनाथ शिंदे हे एक कार्यकर्ते आहेत. जेव्हा जाहीर होईल तेव्हा कळेल. एक दोन दिवसात सर्व उमेदवारी जाहीर होईल, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमध्येही सिंधी बांधवांच्या चेडीचड रॅलीत भाग घेतला. यावेळी आमदार कुमार ऐलानी उपस्थित होते. यावेळी बाईक रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या बाईक रॅलीत श्रीकांत शिंदे यांनी स्वत: बुलेट चालवत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळपासून गुढी पाडव्याचा उत्साह आहे. डोंबिवलीत लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते. उल्हासनगरमध्येही बाईक रॅलीत लोक उत्साहाने सहभागी झाले आहेत. गुढी पाडवा या सणामुळे सर्वांना एका धाग्यात बांधलं गेलं आहे, असं त्यांनी सांगितलं.