अच्छे दिवस आलेत, आता काही मिळू द्या, हा शिवाचा भाव नाही; सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले कान, RSS प्रमुख म्हणाले काय?
RSS Chief Mohan Bhagwat : आता अच्छे दिन आलेत, चांगले दिवस आलेत, आता काही मिळू द्या, हा काही शिवाचा भाव नाही, असा फटकारा सरसंघाचलक मोहन भागवत यांनी लगावला. सध्याच्या राजकीय,सामाजिक मर्मावर त्यांनी अचूक बोट ठेवले. त्यांचा इशारा नेमका कुणाकडे होता, याच्यावर मंथन सुरू आहे.

इतक्या वर्षांपासून आम्ही मेहनत केली आहे. आता अच्छे दिन, चांगले दिवस आले आहेत. तर आम्हाला पण काही मिळाले पाहिजे. हा शिवाचा भाव नाही. आपल्यासाठी काही मिळावे हा काही शिवाचा भाव नाही. उलट हलाहलासारखं विष स्वीकारायला हवे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बौद्धिक केले. उपाय हवा असेल तर ही प्रवृत्ती बदलली पाहिजे, असे त्यांनी कान टोचले. सध्याच्या राजकीय,सामाजिक मर्मावर त्यांनी अचूक बोट ठेवले. त्यांचा इशारा नेमका कुणाकडे होता, याच्यावर मंथन सुरू आहे.
जगाचा भल व्हावे म्हणून आपण विष प्यायचे
नागपुरातील श्री पाण्डुरंगेश्वर शिव मंदिर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दर्शन घेतल्यानंतर तिथे सबोधित केले. शंकराच सामर्थ्य प्रचंड आहे. ते देवाधिदेव आहेत.. मनुष्य प्राण्याला देवापर्यंत पोहोचवण्याचे सगळे मार्ग हे त्यांच्यापासून निघाले आहे. इतकं सामर्थ्य असूनही शिव-विरागी वृत्तीने राहतो. स्वतः करता काही ठेवत नाही. भौतिक जीवनाचे भोग इतरांसाठी आहे. आदर्श म्हणजे त्यागाची पराकोटी आहे.
जगाचा भलं व्हावे म्हणून आपण विष प्यायचे. नाहीतर आजकाल अनेकांच्या मनात प्रश्न येतो इतके वर्ष मेहनत घेतली. आता काही मिळू द्या. आम्हाला काही मिळू द्या हा शिवाचा स्वभाव नाही. आम्हाला काही नको. जे हलाहल असेल ते यांच्याकडे द्या. ज्याच्या तुम्हाला त्रास. ज्याचा तुम्हाला धोका आहे. ते आम्ही अंगावर घेतो. असे जीवन जगायचे खूप आवश्यकता आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
हावरटपणा-कट्टरपणा हेच मूळ
जगाच्या सगळ्या समस्या ज्या उत्पन्न झाल्या त्याचे मूळ कारण इथेच सापडते. माणसाचा हावरटपणा त्याच्यामुळे संकट आहे आणि माणसाचा कट्टरपणा आणि त्याच्यामुळे राग,द्वेष, लढाया आणि युद्ध घडतात. मला पाहिजे बाकीच्यांना मिळालं नाही मिळालं तरी चालेल अशी स्वार्थाची वृत्ती आहे. लोकांमध्ये वर खाली करायचे, ही मनुष्यवृत्तीची काळी बाजू आहे. उपाय हवा असेल तर ही प्रवृत्ती बदलली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
तर प्रवृत्ती बदला
शिवाच पूजन करणे म्हणजे ही प्रवृत्ती बदलायची. मला काही नको अशी प्रवृत्ती हवी. साधेपणाने राहता आले पाहिजे. करण्याचा भाव असला पाहिजे जो शंकराचा आहे. शिव सगळ्यांचा कल्याण करतात म्हणून त्यांना भोळे म्हणतात. सगळ्या जगाच्या व्यवहाराची जाणीव असलेला माणूस त्याला हे कळतं की प्रसंगोपाप्त दृष्टांचं निर्दलन कराव लागत. पण मनामध्ये शत्रुता द्वेष नको. सर्वांविषयी प्रेम हवे. ते सांभाळणं खूप अवघड आहे. पण ते सांभाळण्याची योग्यता शिवामध्ये आहे. म्हणून सगळे देव त्यांची भक्ती करतात. आपला उपयोग जगामध्ये सगळ्यांसाठी व्हावा, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
भाव समजून कृती करा
पवित्र जगणे म्हणजे शिवाची भक्ती आहे. तसे सगळ्यांनी केली पाहिजे. गंगेची पवित्रता समाजाकडे न्यायची आहे. त्याला अभिषिक्त करायच आहे. कावडी यांची मोठी परंपरा आहे. प्रतिकात्मक आचरण आपण करतो, पूजा करतो. मात्र त्याच्या मागे जे अर्थ आहे त्याचे आचरण करणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक आचरणाचा मनावर मोठा संस्कार होतो. प्रत्येक कृतीच्या मागे भाव आहे. भाव समजून कृती केली पाहिजे. माणसाचं जीवन जे संस्कार बदलतात त्यात विश्वाचे जीवन बदलाची ताकद असते. त्याची उदाहरण वेगळी द्यायची गरज नाही, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
नीट पाऊल टाका
आजही विचार करणारे लोक, बुद्धिवान लोक असे म्हणतात जगात काहीतरी परिवर्तन येत आहे.. काळ बदलत चाललेला आहे. या बदलत्या काळात माणसाने आपली पावलं अचूक टाकून योग्य दिशा धरली नाही. तर हा विनाशाचा काळ होईल. काळ ओळखून मनुष्याने मनुष्याने पाऊले नीट दिशेने टाकली तर यातून मनुष्याच्या जीवनाच एक नवीन उन्नत स्वरूप उभ राहील, असं ते म्हणाले.
सगळ्या परस्परविरोधी बाबींची सांगड घालून त्यातून समन्वयाचा नवनीत कस काढायचं, अमृत मंथनातून रत्न निघतात त्याच्यात हलाहलासारखं विषही असतं. ते विष प्राशन अजून जगाला अमृत कसं प्राप्त करून द्यायचं हे परंपरेने आपल्याला ठाऊक आहे. बाह्य कृती करताना त्याच्यातील संस्कार आपण बाणावला तर खरोखर आपल्या भक्तीमुळे देव प्रसन्न होईल. कृतीमागे तो भाव उभा राहिला. त्यातून विश्वाच्या जीवनाचा परिवर्तन करण्याची त्याच्या ताकद आहे. त्यातुन विश्वाला राहत मिळेल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.
