Nagpur: ‘मी माझ्या पगारावर समाधानी’, महसूल आयुक्तालयातील त्या नेमप्लेटची जोरदार चर्चा, प्रकरण तरी काय?
I am satisfied with My Salary: सरकारी कार्यालयात गेलं की टेबलाखालून चिरीमिरी द्यावीच लागते असा एक गोड गैरसमज समाजात पसरलेला आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून थेट लाच देण्याचे, आमिष देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पण काही अधिकारी लोकांना अगोदरच असं करण्यासाठी सावध करतात. त्या नेमप्लेटची त्यामुळेच जोरदार चर्चा सुरू आहे.

Additional Commissioner Rajesh Khawle: सरकारी कार्यालयात चिरीमिरी दिल्याशिवाय फाईल हालत नाही. ती एकाच ठिकाणी धुळखात पडते असा सार्वत्रिक समज आहे. काही खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे हा समज बळकट झाला आहे. तर हमाम में सब…असा ही समज पाहायला मिळतो. त्यातून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिठाईचे पेटारे जातात. त्यात कोणत्या मिठाई असतात हे वेगळं सांगायला नको. अनेकजण झटपट काम व्हावं. कायद्याला बगल देऊन काम व्हावं यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आमिष देतात. पण काही अधिकाऱ्यांना या गोष्टी खपत नाहीत. प्रत्येकाला समज देण्यापेक्षा त्यावर एका अधिकाऱ्याने क्लृप्ती शोधून काढण्यात आली आहे. नागपूरमधील विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांची नेम प्लेट सध्या चर्चेत आली आहे.
नेम प्लेटची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा
नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांच्या दालनात प्रवेश करताच टेबलवरील नेम प्लेट लक्ष वेधून घेते. ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे.’ अशी ओळ सर्वांचे लक्ष वेधून घेते. या एका ओळीतून खवले यांनी मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या नेमप्लेटची सध्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. खवले यांनी आमिष देणाऱ्यांना काही बोलण्यापूर्वी सावधगिरीचा इशारा या नेम प्लेटवरून दिला आहे.
सरकारी कामं करताना काम झटपट व्हावं अथवा ते कायद्याच्या कचाट्यात अडकू नये साठी अनेक जण अधिकाऱ्यांना थेट लाचेचं आमिष दाखवतात. त्यासाठी काही खास कोडवर्ड वापरतात. काम घेऊन येतानाच मिठाईचा बॉक्स, पुष्पगुच्छ अथवा फाईलवर वजन अशा खास कोडवर्डमध्ये अर्थपूर्ण व्यवहार करण्यात येतो. पण अशा लोकांना राजेश खवले यांनी त्यांच्या नेमप्लेटवरून सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्याची नागपूरमधील महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा पंचायत समितीमधील सतिश बुद्धे यांची आठवण
दरम्यान या नेमप्लेटवरून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अधिकारी, जनतेला सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांची आठवण झाली. त्यांनी कार्यालयाबाहेर मी माझ्या पगारावर समाधानी आहे, असा फलक लावत आपल्या कार्यालयात भ्रष्टाचाराला अजिबात थारा नसल्याचे ठणकावले होते. त्या फलकाची दोन वर्षांपूर्वी जोरदार चर्चा झाली होती.
मी दौऱ्यावर असताना भेटू शकलो नाही. तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरूपात पाठवाव्यात. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर सोशल मीडियावर नाव व गावासह तक्रारी द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांनी व्हॉट्सॲप क्रमांकही दिला होता. त्यांनी कार्यालयाच्या बाहेरचा भलामोठा फलक लावला होता. त्यामुळे जनतेत त्यांच्याविषयी आदर तयार झाला. तर भ्रष्टाचारी आणि इतर अधिकाऱ्यांवर नैतिक दबाव आला. तसाच प्रकार आता नागपूर महसूल विभागीय कार्यालयात दिसून आला. त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
