नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच सीमावाद आणि बेताल वक्तव्यावरून हे अधिवेशन गाजणार असल्याची चिन्हं दिसून येत होती. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरून जोरदार निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बसवराज बोम्मई यांनी आपले ट्विटर हँडल हॅक झाले होते असे सांगितले होते.