महायुतीत मोठी बंडखोरी? भाजप आमदार थेट अजितदादांच्या बंगल्यावर, बंद दाराआड काय घडतंय?
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राजकीय हालचाली वाढल्या असून, आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नांदेडच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा ठोकला आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटप आणि उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी विविध नेत्यांकडून सध्या जोरदार लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेला मुंबईतील देवगिरी बंगला सध्या राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र बनला आहे.
नांदेड विधानपरिषद मतदारसंघाची जागा आपल्याच पक्षाला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी देवगिरी बंगल्यावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. नांदेडमधील भाजपचे आमदार आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी थेट देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नांदेडच्या जागेबाबत सविस्तर चर्चा केली. नांदेड विधानपरिषदेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटली पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी चिखलीकरांनी या भेटीदरम्यान मांडल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहेत. प्रतापराव चिखलीकरांच्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
चव्हाण विरुद्ध चिखलीकर: जुना संघर्ष पुन्हा पेटणार?
नांदेडच्या राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता विधानपरिषदेच्या या एका जागेवरून चिखलीकर आणि चव्हाण गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांचे समर्थकाच आघाडीवर असतानाच आता चिखलीकरांनी ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात नेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चव्हाण यांच्या स्थानिक वर्चस्वाला शह देण्यासाठीच चिखलीकरांनी ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोणाचे पारडे जड? सर्वांचे लक्ष लागून
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून श्रेष्ठींवर दबाव आणला जात आहे. चिखलीकरांच्या आग्रहामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटणार की भाजप आपल्याकडेच ठेवणार, यावर महायुतीतील पुढील गणितं अवलंबून आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या जागेकडे लागले आहे.
