Malegaon : मालेगाव तालुक्यात चक्क रस्ता गेला चोरीला, तक्रार दाखल होताचं पोलिस चक्रावले

गावातून पाच मीटर रुंद व दोन किलोमीटर लांबीचा रस्ता चोरीला गेला आहे. या रस्त्याचा शोध घेण्यासाठी येणारे पोलीस पथक तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी रस्ता शोधतांना इनकॅमेरा चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी द्यानद्यान यांनी केली आहे.

Malegaon : मालेगाव तालुक्यात चक्क रस्ता गेला चोरीला, तक्रार दाखल होताचं पोलिस चक्रावले
मालेगाव तालुक्यात चक्क रस्ता गेला चोरीला
Image Credit source: tv9 marathi
मनोहर शेवाळे

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 05, 2022 | 8:18 AM

मालेगाव : मालेगाव (Malegaon) शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी (Bike), दागिने, कांदा, कापूस, पशुधन, कार आदी चोरीला गेल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडे (Police) गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा शोध घेण्यात काही प्रमाणात पोलिसांना यश देखील आले आहे. मात्र नुकतेच मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तालुक्यातील टोकडे येथील दोन किलोमीटरचा रस्ता चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता थेट चोरीचा रस्ता शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात विठोबा द्यानद्यान यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार, पोलिस चक्रावले…

तालुक्यातील टोकडे येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुलभूत विकास निधीतून गावांतर्गत दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखला देखील अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदार सुजन पगार यांचा रस्ता कामासाठी खर्च झालेला १७ लाख ८४ हजार ७८१ रुपयांचे बिल देखील त्यांना अदा करण्यात आले आहे. मात्र रस्ता काम पूर्ण होवून अवघा तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतांना रस्ता चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे. फिर्यादी द्यानद्यान यांनी संपूर्ण गावात फेरफटका मारुन रस्त्याचा शोध घेतला मात्र त्यांना रस्ता गावांतर्गत कुठेही मिळून आला नाही. अखेर त्यांनी हताश होवून मालेगाव तालुका पोलीस ठाणे गावातील रस्ता चोरीला गेल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

रस्ता चोरीला गेल्याचे उघड झाले आहे

रस्ता पूर्ण झाल्याप्रकरणी अभिलेखात नोंद देखील करण्यात आली आहे. शाखा अभियंता, उपअभियंता यांनी गावात जागेवर येवून पडताळणी करीत प्रशासकीय मान्यतेनंतर संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. मात्र फिर्यादी द्यानद्यान यांनी गावात येवून रस्त्याचा शोध घेतला. मात्र रस्ता चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चोरीला गेलेला रस्ता शोधून आणणाऱ्याला रोख स्वरुपात एक लाख रुपये बक्षिस देखील देण्यात येणार असल्याचे फिर्यादी द्यानद्यान यांनी सांगितले. मात्र सदरचा चोरीला गेलेला रस्ता शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

रस्त्याची इनकॅमेरा चौकशीची मागणी

गावातून पाच मीटर रुंद व दोन किलोमीटर लांबीचा रस्ता चोरीला गेला आहे. या रस्त्याचा शोध घेण्यासाठी येणारे पोलीस पथक तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी रस्ता शोधतांना इनकॅमेरा चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी द्यानद्यान यांनी केली आहे. दरम्यान रस्ता शोधून देणाऱ्याला रोख स्वरुपात एक लाख रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें