Eknath Shinde : मोदींचे हात देणारे, येणाऱ्या निवडणुकीत….विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदेंचा मोठा विश्वास!
नवी मुंबईच्या विनातळाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. महाविकास आघाडीने विकासकामे रोखली होती, असा दावा त्यांनी केला.

Navi Mumbai Airport Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांच्या हस्ते आपण मोठमोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन करतो. आठ वर्षापूर्वी ग्रीन फ्रिल्डचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. मोदींचा हात लागतो, त्याचं सोनं होतं हे तुम्ही पाहातच आहे. प्रत्येक विमान टेक ऑफ करतं. लँडिंगही करतं. पण भारताला महाशक्ती बनवण्यासाठी २०१४ साली मोदींनी टेक ऑफ केलं आहे. प्रगतीसाठी आपण एकत्र येतो. पण जेव्हा गगनभरारी घ्यायची असते तेव्हा मोदींची आठवण येते. हे फक्त एअरपोर्ट नाही. तर नव्या भारताच्या संकल्पासाठी मोदींचा महाराष्ट्रावरचा विश्वास आहे, अशा भावना यावेळी शिंदे यांनी व्यक्त केल्या.
महाविकास आघाडीने विकासाला स्थगिती दिली
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारतर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. या भाषणात एकनाथ शिंदे यांनी बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. सर्वात लांब भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटनही मोदींनीच केलं होतं. दोन चार वर्षातच सर्व मेट्रो लाईन सुरू होईल. महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला फक्त एक तासच लागला पाहिजे. हे काम फक्त महायुतीच करू शकते. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले. नंतर महाविकास आघाडी आली. त्यांनी अनेक प्रकल्पात स्पीड ब्रेकर टाकले. स्थगिती दिली, असे शिंदे म्हणाले.
मोदी हे विकासाची आंधी
मोदींचे हात देणारे आहेत. काँग्रेस आघाडी सारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाही. काँग्रेसचं करप्शन फर्स्ट. आणि मोदींचं नेशन फर्स्ट हा फरक आहे. मोदी हे विकासाची आंधी आहेत. विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेलीच महायुती विजयी होईल यात शंका नाही, असे म्हणत शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्द पाळला
तसेच, आपण हे स्थगिती सरकार हटवलं. सर्व स्पीड ब्रेकर बाजूला केले. गेल्या तीन वर्षात वेगाने विकास होत आहे. मोदींमुळे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलं नाही. आपला शेतकरी संकटात आहे. या पूरग्रस्तांसाठी आपण कालच एक ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्द पाळला आहे. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले आहे, असे सांगत त्यांनी सरकार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील भाषण केले. मोदींच्या हस्ते मुंबईला नवे पंख देणाऱ्या चार प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. मोदींनी नेहमीच आपल्याला साथ दिली आहे. ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे. विविध प्रकल्पांचं आज लोकार्पण झालं. यातून विकास आणि रोजगार निर्माण होणार आहे. नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगार निर्माण होणार आहे. विमानतळ उभं करण्याचं काम सोपं नव्हतं. पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण त्यावर काम केलं. मोदींनी आपल्याला साथ दिली, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
