Navi Mumbai Fire : दिवाळी साजरी करून गाढ झोपले… अचानक इमारतीला लागली आग, 6 जणांचा मृत्यू; नवी मुंबईत हळहळ
Navi Mumbai Fire : मध्यरात्री 1च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली, अनेक जण तेव्हा घरात गाढ झोपले होते. बघता बघता बिल्डींग धुराने वेढली गेली, आगीच्या ज्वाळांनी भयानक रूप धारण केलं. पाहता पाहता ही आग 10 व्या, 11व्या, 12 व्या मजल्यावर पसरली.

दिवाळीच्या दिवशीच नवी मुंबईतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वाशीतील एका बहुमजली इमारतीमध्ये भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह 4 जण मृत्यूमुखी पडले तर 10 जण जखमी झाले. तर कामोठे येथे लागलेल्या आगीत आई-मुलीने जीव गमावला. एकाच दिवशी 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी सेक्टर-14 मधील रहेजा रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दिवाळीनिमित्त मजा करून, सण साजरा करून इमारतीतील सर्व रहिवासी झोपायला गेले होते. तेव्हाच इमारतीच्या 10 व्या मजल्यावर आग लागली आणि बघता बघता ती 11 व्या आणि 12 व्या मजल्यापर्यंत पसरली. आगीच्या ज्वाळा आणि धुराने संपूर्ण इमारत वेढली गेली. त्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तसेच एका 80 वर्षांच्या वृद्धेनेही जीव गमावला.
6 वर्षीय वेदिका नायर, तिचे आई वडील यांचा मृत्यू झाला. ते 12 व्या मजल्यावर रहात होते, आग लागल्यावर धुरामुळे ते बाहेर पडले नाहीत आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. तर 10 व्या मजल्यावरील एका 80वर्षाच्या महिलेचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.
आग लागताच गोंधळ, अनेक जण बाल्कनीत अडकले
आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बचाव आणि मदत कार्यादरम्यान, अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, तर काहींना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र आग लागल्याचे समजताच बिल्डींगमध्ये प्रचंड गोंधळ माजला. अनेक लोक बाल्कनीमध्ये अडकले होते. अग्निश्मन दलाच्या जवानांनी शिड्या आणि हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं. प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर येत आहे, मात्र अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.
कामोठे मध्ये भीषण आगीत आई-मुलीचा मृत्यू
नवी मुंबईत आगीची आणखी एक दुर्घटना घडली असून कामोठे येथील आगीत आई-मुलीने जीव गमावला. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये सोमवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत भीषण दुर्घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये आई आणि मुलगी यांचा समावेश आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. सोसायटीतील सर्व रहिवाशांना तात्काळ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, आग लागली तेव्हा घरात पाच जण उपस्थित होते. यापैकी तिघांनी वेळेवर बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले, परंतु आई आणि मुलगी घरातच अडकल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आणि अग्निशमन विभाग या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे कामोठे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
