टोरंट प्रकल्पाला अजितदादा गटाचा विरोध? सुनील तटकरे यांची सरकारचं टेन्शन वाढवणारी मागणी काय?
भीमाशंकरजवळच्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाला ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेसचा तीव्र विरोध होताच, आता अजित पवार गटानेही फेरविचार करण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सह्याद्रीच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचा आणि वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला या प्रकल्पाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे.

भीमाशंकरच्या कुशीत होणाऱ्या टोरंट जलविद्यूत प्रकल्पाला ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्ष कत्तलीवरून या दोन्ही नेत्यांनी विरोध केला आहे. या नेत्यांनी कर्जला जाऊन पाहणी केली तसेच स्थानिकांशी संवादही साधला होता. तसेच हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला होता. मात्र, हा प्रकल्प कसा योग्य आहे आणि झाडे तोडल्यानंतर त्याबद्दल्यात लाखो झाडे कशी लावली जाणार आहेत? हेच सरकारचे मंत्री सांगत होते. मात्र, महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या अजितदादा गटाने आता या प्रकल्पाला विरोध केल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची मागणी केल्याने सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. भीमाशंकरच्या कुशीत होऊ घातलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे. या प्रकल्पासाठी सरकारने विविध परवानग्या मिळवल्या आहेत. परंतु सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि जनभावना लक्षात घेऊन सरकार याचा फेरविचार करेल, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे गट आक्रम
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून वातावरण पुन्हा तापले आहे. साई डोंगर परिसरातील वृक्षतोड आणि प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन मोजणीच्या नोटिसांमुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा साई डोंगर परिसराला भेट देऊन वृक्षतोडीची पाहणी केली आहे. त्यामुळे टोरेंट प्रकल्पाविरोधातील संघर्षाला आता नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यातील साई डोंगर परिसरात प्रस्तावित टोरेंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असतानाच आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. दुसरीकडे, प्रकल्पासाठी प्रस्तावित रस्त्याच्या कामाकरिता जमीन मोजणी करण्यासंदर्भातील नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना पाठवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, टोरेंट प्रकल्पाविरोधात आगामी काळात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली ठाकरे गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा काय असेल आणि स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर ठाकरे गट कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वृक्षतोड, जमीन मोजणीच्या नोटिसा आणि स्थानिकांचा वाढता विरोध यामुळे टोरेंट प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.
