संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?; नारायण राणेंचा हल्लाबोल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशारा भाजपला दिला होता. त्याला भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (bjp leader narayan rane)

संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?; नारायण राणेंचा हल्लाबोल
नारायण राणे, केंद्रीय मंत्री

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊ, असा इशारा भाजपला दिला होता. त्याला भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत काय शिंगावर घेणार? त्यांना शिंग आहे कुठे? अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. (bjp leader narayan rane warn sanjay raut over sena bhavan agitation)

शिवेसना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला. ते काय शिंगावर घेणार? शिंगावर घ्यायला त्यांना शिंग आहे कुठे? आताची शिवसेना ही बिन शिंगाची शिवसेना आहे. ते काय करणार? एवढे फटके ठिकठिकाणी पडत आहेत. ही फटके देणारी शिवसेना राहिली नाही. केवळ पैसा जमाव सेना उरली आहे. पैसा गोळा करणारी ही शिवसेना आहे, अशी टीका राणेंनी केली.

असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे दुर्देव

शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला होता. त्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री हेच करणार. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे. त्यांच्याकडे काही वैचारिकता आहे का? भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. महिलांवर हल्ला करणाऱ्यांचं कौतुक करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

पवार जे बोलतात त्याचा दुसरा अर्थ लावायचा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना हा सर्वात विश्वास असणारा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही राणेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार शिवसेनेवर बोलले. त्याधीही ते शिवसेनेवर बरंच बोलले आहेत. मागचं सगळं काढून तुम्ही पाहा. आज पवारसाहेब जे बोलले ते उद्याही तेच बोलतील असं नाही. ते जे बोलतात त्याचा दुसरा अर्थ लावायचा असतो. आज शिवसेना विश्वासू पक्ष असल्याचं ते म्हटले. उद्या शिवसेना सर्वात दगा देणारा पक्ष म्हणूनही ते टीका करतील, असा चिमटा त्यांनी काढला.

घडामोडी घडत आहेत…

यावेळी राणेंनी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत, असं सांगून राज्याच्या राजकारणावरचा सस्पेन्स वाढवला आहे. घडामोडी घडत आहेत. पण मी त्यावर आता भाष्य करणार नाही. पण या घडामोडीतून महाराष्ट्रात काही तर नक्की घडेल. त्यावर देवदेवताच निर्णय घेतील. आता देवतांच्या प्रसादाची चेष्टा करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. काही तरी नक्कीच घडेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं. (bjp leader narayan rane warn sanjay raut over sena bhavan agitation)

 

संबंधित बातम्या:

स्वत:ला सांभाळा, तुमच्या वाटेला कधी शिवथाळी येईल हे समजणारही नाही; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार का? नारायण राणेंचं अधिकृत वक्तव्य पहिल्यांदाच जगासमोर

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळेच आमची तिकिटे कापली; सुनील देशमुखांचा गौप्यस्फोट

(bjp leader narayan rane warn sanjay raut over sena bhavan agitation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI