हापूस खरेदीसाठी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जात असाल तर सावधान! तुमची फसवणूक होऊ शकते

देवगड हापूसच्या नावाखाली बाजार आवारात कर्नाटक आणि केरळ आंबा विकला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे (Customers are being cheated by selling mangoes on name of hapoos).

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 23:57 PM, 21 Apr 2021
हापूस खरेदीसाठी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जात असाल तर सावधान! तुमची फसवणूक होऊ शकते
हापूस खरेदीसाठी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जात असाल तर सावधान!

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये (Mumbai APMC Fruit Market) फळांचा राजा आंब्याच्या जवळपास 50 हजार पेट्या दाखल होत आहेत. शिवाय बाजारभाव काही अंशी ग्राहकांच्या आवाक्यात आले आहे. ग्राहक आंबा खरेदीसाठी मार्केटमध्ये येऊ लागले आहेत. पण देवगड हापूसच्या नावाखाली बाजार आवारात कर्नाटक आणि केरळ आंबा विकला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबत एपीएमसी प्रशासनाने व्यापाऱ्यांना परिपत्रक काढून कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच संबंधित राज्यातील आंबा त्याच राज्याचे नाव सांगून विक्री केला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे (Customers are being cheated by selling mangoes on name of hapoos).

ग्राहकांनी दक्षता घेणं आवश्यक

जर तुम्हाला फसवणूक होते असे वाटत असेल तर मार्केट प्रशासनाशी संपर्क साधून तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकता. मुख्य व्यापाऱ्यांकडून कच्चा आंबा घेऊन पिकवून विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आंबा घेताना दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे (Customers are being cheated by selling mangoes on name of hapoos).

हापूस आंब्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

एप्रिल महिन्यापासून हापूस हंगाम अधिक जोमाने सुरु झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आंब्याची आवक देखील वाढली. बाजारभाव सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा आंबा खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. पण हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि केरळ आंबा विकून नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे रीतसर तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंबा हंगाम सुरु झाल्यापासून मोठ्या प्रमाणात ही फसवणूक चालू असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कर्नाटक-केरळच्या आंब्यांच्या नावांचा उल्लेख नाही

ज्याप्रकारे हापूस आंबा देवगड, रत्नागिरी, राजापूर, श्रीवर्धन, अलिबाग आणि जुन्नर अशा नावाने विकला जातो. त्याच प्रकारे परराज्यातील आंबा विकला गेला पाहिजे. पण कर्नाटक आणि केरळ राज्यातील आंबा हा क्रेटमध्ये येत असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही नावाचा उल्लेख नसतो. शिवाय तो बऱ्याच अंशी हापूस सारखा दिसत असल्याने त्याची हापूस म्हणून विक्री केल्यास ग्राहक फसण्याची शक्यता असते.

हापूस आणि परराज्यातील आंब्यांच्या किंमतीत मोठा फरक

केरळ आणि कर्नाटक आंबा हा 100 ते 150 रुपये किलो दराने विक्री केला जातो. तर हापूस आंबा चार ते सहा डझन पेटी मध्ये विकला जातो. त्यामुळे दोन्ही आंब्याच्या दरात फारच तफावत आहे. केरळ, कर्नाटक आंबा 2 हजार रुपयात दोन पेट्या तयार होतात. तर हापूस आंबा 3 ते 5 हजार रुपयांना एक पेटी विकली जाते. त्यामुळे काही व्यापारी दोन्ही आंबे एकत्र करून ग्राहकांची फसवणूक करतात आणि हजारो रुपये कमवतात.

दोघांमध्ये फरक कसे ओळखाल?

याबाबत बाजार समिती प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून अशा प्रकारे फसवणूक करून आंबा विक्री करणाऱ्या व्यपाऱ्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. तर ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे कि, हापूस आंब्याचे साल पातळ आहे. तर कर्नाटक-केरळ आंब्याचे साल जाड असते. शिवाय आंब्यांच्या आकारात देखील फरक असतो, तो ओळखूनच आंबा खरेदी करावा, असे मार्केट सह सचिव चंद्रशेखर सोमकुंवर यांनी सांगितले.

संबंधित बातमी : ओरिजनल हापूस कसा ओळखणार? कोकणातील बागायतदारांचा मॉडर्न फंडा, प्रत्येक आंब्यावर क्युआर कोड