ईडी नाही तर तू सनम बेवफा; मिटकरींचा टोला

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरू झाली आहे. (ncp leader amol mitkari slams ed)

ईडी नाही तर तू सनम बेवफा; मिटकरींचा टोला
अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी

अकोला: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात ईडीच्या सुरू असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. “भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं ‘सनम बेवफा’ म्हणतील,” असा बोचरा वार अमोल मिटकरी यांनी केला आहे. (ncp leader amol mitkari slams ed)

अमोल मिटकरी यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून ही बोचरी टीका केली आहे. भाजपा प्रिय ED, नोट बंदी झाल्यानंतर जय अमित शहा यांच्या कंपनीकडे जे 90 करोड रुपये होते, नोटबंदी नंतर 700 करोड रुपये जमा झाले. ही माहिती आजपर्यंत तू का दिली नाहीस गं ? कधीतरी त्यांच्या घरी जाऊन पण समन्स बजावत जा ! मग वाटेल तू भाजपाची गुलाम नाहीस, असा खोचक टोला मिटकरी यांनी एका ट्विमधून लगावला आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये, भाजपा प्रिय ईड, आता तुझ्याबद्दल मात्र शंका यायला लागली आहे. देशात हजारो कोटीचे घोटाळे करणार्‍या भाजपच्या नेते मंडळींना 2014 नंतर आजपर्यंत एकही समन्स बजावला नाहीस. तू भाजपची प्रवक्ता झालीस का गं? तू अशी दुटप्पी का वागते सांगतेस का?, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजप नेत्यांचा पत्ता देतो

शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नाव घेऊनच थेट टीका केली आहे. भाजपा प्रिय ईडी, एकदा महाराष्ट्रात पण ये. मेहता, दरेकर, बापट यांच्या घराचा पत्ता तुझ्याकडे नसेल. हवा तर मी देतो. मात्र अशी दुटप्पी वागू नकोस. एखाद कप कॉफी प्यायला इकडे पण जाऊन ये. नाहीतर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या “सनम बेवफा” म्हणतील लोकं…, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

“खडसेंना नोटीस हे होणारच होतं. भाजपविरोधात जो कोणी मोहिम उघडले, त्यांना केंद्रातून नोटीस पाठवण्यात येईल. प्रताप सरनाईकांनी कंगना रानौत आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आवाज उठवला, हक्कभंग सादर केला. त्यावेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवली. यापूर्वी शरद पवारांनाही नोटीस पाठवण्यात आली. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळत आहेत, त्याचाच परिणाम म्हणजे ईडीची नोटीस आहे”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. तर, खडसे यांनी आपल्याला अद्याप नोटीस आली नसल्याचं म्हटलं आहे.

मिटकरी यांनी ईडीला फेसबूकवर लिहिलेलं पत्रं जसंच्या तसं!

भाजपा प्रिय ED, सप्रेम नमस्कार…..

तू भाजपाची अत्यंत जवळची सखी असल्यामुळे, तुला प्रिय म्हणावे लागले. कारण हल्ली तू 2014 नंतर भाजपच्या नेत्यांच्या घराकडे फिरकलीच नाहीस. तू आणि तुझी बहीण CBI या दोघींच्या पण वापर हनीट्रॅप सारखा तुझ्या प्रियकराकडुन होतोय हे तुला कळत कसं नाही??

बरं तुला एक प्रश्न विचारावा वाटतो, नोटबंदी झाली त्यावेळी जय अमित शहा यांच्याकडे 90 कोटी रुपये होते, नोटबंदी नंतर ती रक्कम 700 कोटींच्या घरात गेली, हे तुला माहित असताना सुद्धा तू त्यांना समन्स का नाही बजावला? अमित शहांच्या इतक्या प्रेमात पडशील असं वाटलं नव्हतं. ऐ भाजपा प्रिय ED, देशात हजारो कोटींचे घोटाळे करणाऱ्या भाजपच्या नेतेमंडळींना 2014 नंतर तू एकही नोटीस दिली नाहीस. तू भाजपाची प्रवक्ता झाली आहेस का??

बरं दिल्लीतील राहू दे. निदान महाराष्ट्रात तरी मेहता, दरेकर, बापट, पंकजाताई यांच्या घराचा पत्ता तुझ्याकडे असेल ना? नसेल तर तसं सांग, हवा तर मी देतो. मात्र एकदा चहाचा कप (चहावाल्याच्या प्रेमात असल्यामुळे) घ्यायला त्यांच्याकडे पण जाऊन येशील का? तू भाजपची इतकी गुलाम होशील असं वाटलं नव्हतं. मात्र तुझ्याबद्दल आता जनमानसात शंका यायला लागली आहे. तुझ्या घरातील सगळे पवित्र पापी झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याच्या घरात वाकून बघायचं हे काही मनाला पटलं नाही बघ. याला “सनम बेवफा” असं म्हणतात. अशी दुटप्पी मनाची भूमिका घेऊन तुझ्यावर प्रेम करणाऱ्या भाजपाला जनमानसात खोटेपणाचा प्रतिष्ठेचा बुरखा पांघरूण घालण्यात तू जे काही मदत करते आहेस ना ती पब्लिक सगळे जाणून आहे. मात्र तू सरकारी यंत्रणेकडून कधी भाजपाची प्रेयसी झालीस कळलेच नाही. ठिक आहे आज तुझी वेळ आहे, पण कधीकाळी आदरणीय पवार साहेबांनी तुला दिवसा तारे दाखवले होते हे विसरू नकोस. काळ वेळ प्रत्येकाचा येत असतो. भाजपाची प्रेयसी बनून राहण्यापेक्षा जनमानसात तुझी खालावलेली प्रतिमा उंच करण्याचा प्रयत्न करशील अशी अपेक्षा करतो. सनम बेवफा ऐवजी वफादार म्हणून तुझ्याकडे प्रत्येकजण बघेल अशी सरत्या वर्षाच्या शेवटी तुझ्याकडून माफक अपेक्षा. गुलामीची बंधने तोडून जरा धाडसाने पुढे ये. तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मात्र तुझ्या प्रियकराच्या नादी लागून तु तुझ स्वतःचं वाटोळं करून घेतलं हे नक्की… (ncp leader amol mitkari slams ed)

 

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंवर वक्रदृष्टी का? ED नोटीस येण्याची 5 कारणे

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस  

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता   

(ncp leader amol mitkari slams ed)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI