रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीचा मोठा धक्का, खुलासा येण्याआधीच पदावरून उचलबांगडी, मिटकरींचाही पत्ताकट; काय आहे प्रकरण?
Rupali Thombare Patil: गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना दिसल्या. आता त्यांची पक्षातील पदावरून उचलबांगडी केली आहे

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटील यांना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं. पण ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ठोंबरे पाटील यांची पक्षातील पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रुपाली ठोंबरे पाटील या अजितदादा गटाच्या प्रवक्त्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांनाही प्रवक्ते पदावरून काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यात रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव नाहीये. तर हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच आधीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
म्हणून उचलबांगडी
बीडच्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालं होतं. या प्रकरणात पोलिसांचा आणि काही राजकीय नेत्यांच्या हात असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. मात्र ही माहिती देताना चाकणकर यांनी पोलिसांचीच बाजू उचलून धरली होती. त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंपासून अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. चाकणकर यांच्या या भूमिकेवर रुपाली पाटील यांनीही टीका केली होती. त्याची पक्षाने गंभीर दखल घेऊन त्यांना नोटीस बजावली होती.
मात्र, पक्षाने नोटीस बजावली नसून खुलासा पत्र दिल्याची सारवा सारव रुपाली पाटील यांनी केली होती. त्यानंतर दोनच दिवसाने पक्षाने रुपाली पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केल्याने रुपाली पाटील यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे रुपाली पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
