Rupali Chakankar vs Rupali Thombre : NCP मध्ये राहून रुपाली चाकणकरांविषयी बोलणं अखेर दुसऱ्या रुपालीला महाग पडलं, पक्षाने उचललं असं पाऊल
Rupali Chakankar vs Rupali Thombre : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षातीलच महिला नेत्याने वक्तव्य केली होती. हा प्रकार सातत्याने सुरु होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या प्रकरणात पाऊल उचललं आहे.

मागच्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दोन महिला नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. अखेर त्या वादासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे.रुपाली ठोंबरे यांना पक्षाने प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. रुपाली ठोंबरे याआधी महाराष्ट्र नविर्माण सेनेत होत्या. रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती. मात्र, मागच्या काही महिन्यांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील मतभेद समोर आले होते. रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे टीका केली होती.
राष्ट्रवादीतील या रूपाली Vs रूपाली या वादात पक्षाने प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्यावर शिस्तभंग नोटीशीचा बडगा उगारलाय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रूपाली ठोंबरे यांना अखेर महागात पडल्याचं दिसतय. “खुलासा देण्यासाठी 7 दिवसांचा कमी वेळ दिला आहे. हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा” असं रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांवर काय आरोप केला?
मागच्या आठवड्यात रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्या मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्हद्वारे केला होता. त्यानंतर या महिलेने पुन्हा हा दावा मागे घेतला. यानंतर महिलेने तिसरा व्हिडीओ टाकत दुसरा व्हिडीओ दबावाखाली केला असं म्हटल्याने वाद वाढला. माधवी खंडाळकर यांना चाकणकर यांनीच फूस लावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता. रुपाली ठोंबर या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. स्पष्टवक्तेपणा ही सुद्धा त्यांची ओळख आहे.
