राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या कार्यालयाला कुलूप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP First Office) दिग्गज नेते पक्ष सोडून जात असतानाच, आता पक्षाच्या राज्यातील पहिल्या कार्यालयालाही (NCP First Office) कुलूप लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या कार्यालयाला कुलूप

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP First Office) दिग्गज नेते पक्ष सोडून जात असतानाच, आता पक्षाच्या राज्यातील पहिल्या कार्यालयालाही (NCP First Office) कुलूप लागलं आहे. कोल्हापूरमधील पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. गेली वीस वर्षे हे कार्यालय महिला पदाधिकारी संगीता खाडे यांच्या जागेत होतं. कोणतंही भाडं न आकारात त्यांनी ही जागा दिली होती. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बेदखल केलं जात असल्याचा आरोप करत, त्यांनी कार्यलयाला कुलूप लावलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला.

दरम्यान देवस्थान समितीच्या सदस्य असलेल्या संगीता खाडे यांची मुदत संपली आहे. त्या भाजपच्या वाटेवर असून भाजपकडून त्यांना मुदतवाढ दिली जाणार असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.

स्थापनेपासूनच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर अशा नेत्यांनी जिल्ह्यात हा पक्ष वाढवला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही या नेत्यांना ताकद देऊन हा बालेकिल्ल्या शाबूत ठेण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यावर पकड असताना आपलं पक्ष कार्यालय इथं हवं अशी अपेक्षा शरद पवार यांनी खानविलकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी जागेचा शोध सुरू झाला, पण अपेक्षित जागा मिळत नव्हती. त्यावेळी संगीता खाडे यांनी आपल्या सुरू असलेल्या घराच्या बेसमेंटची जागा देण्याची तयारी दाखवली. त्यांची अट मात्र एकच होती, उद्घाटनाला शरद पवार आले पाहिजेत. त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा झाला आणि पक्षाला राज्यातील पाहिलं कार्यालय मिळालं.

गेली वीस वर्षे खाडे कुटुंबीयांनी ही जागा विनामोबदला पक्षाला वापरायला दिली. त्या बदल्यात पक्षानेही त्यांना देवस्थान समितीचे सदस्य, महिला आघाडीच्या प्रमुख ही पदे दिली. मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांना बंगल्याचं नूतनीकरण करायचं होतं आणि याचसाठी काही दिवस कार्यालय दुसरीकडे हलवा अशी विनंती त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली. मात्र त्याची दखलच घेतली जात नव्हती. अखेर तगादा लावल्यानंतर येथील सामान हलवलं गेलं, पण खाडे यांच्याविरोधात टीका केली जाऊ लागाल्याने त्यांनी पुन्हा इथं कार्यालय सुरू न करू देण्याचं ठरवलं असून आपल्या पदाचाही राजीनामा दिला.

दरम्यान संगीता खाडे या राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले धनंजय महाडिक यांचं नेतृत्व मानतात. त्यातच त्यांची देवस्थान समिती सदस्यपदाची मुदत संपली आहे. मुदतवाढ मिळवण्यासाठी त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. खाडे यांनी मात्र घरी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याच सांगत या चर्चेत तथ्य असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं.

या वीस वर्षांत राष्ट्रवादीने अनेकांना मोठं केलं. मात्र पक्षाचं स्वतःचं कार्यालय असावं अशी गरज कोणालाच वाटली नाही. आज पक्ष अडचणीत असताना आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षाच्या जिल्हा कार्यलयाला टाळं लावण्याची वेळ पक्षावर आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *