यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

नवरात्र काळात भाविकांना दर्शनासाठी तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही.

Nupur Chilkulwar

|

Oct 06, 2020 | 7:08 PM

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा यावर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव (No entry For Devotees In Tuljapur) भक्तांच्या उपस्थिती विना अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. नवरात्र काळात तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहर जनतेसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार तथा मंदिर संस्थांनचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी दिली. नवरात्र काळात भाविकांना दर्शनासाठी तुळजापूर शहरात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, नवरात्र काळात कोजागिरी पौर्णिमा संपेपर्यंत नागरिक आणि भाविकांसाठी तुळजापूरात प्रवेशबंदी असणार आहे (No entry For Devotees In Tuljapur).

नवरात्रात देवीच्या नित्य पूजा कुलाचार, धार्मिक विधी हे दरवर्षी नियमाप्रमाणे होणार आहेत मात्र गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. सार्वजनिक मेळावे आणि समारंभ यांच्यावर निर्बंध असणार आहेत.

उत्सवादरम्यान धार्मिक विधी काळात पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी असे 50 पेक्षा जास्त व्यक्तिंना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. पुजारी, मानकरी आणि कुलाचार करणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे. व्यापारी आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तांदळे यांनी दिली (No entry For Devotees In Tuljapur). यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले उपस्थित होते.

नवरात्र काळात भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी नवरात्र मंडळ आणि भाविकास बंदी असणार असून या काळात तुळजापूर शहरात प्रवेश बंद असणार असल्याने सर्व प्रवेशद्वार आणि रस्त्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे. तुळजाभवानी मातेच्या रोजच्या धार्मिक पूजा विधी होणार असून मंदिर संस्थांच्या वेबसाईटवर देवीचे भक्तांनी लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर प्रवेशबंदी असल्याने याची माहिती शेजारील राज्यांना दिली असून त्यांनी देखील खबरदारीच्या उपाययोजना करणेस सुरुवात केल्याचे तांदळे म्हणाले (No entry For Devotees In Tuljapur)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें