ओला, उबेर चालकांच्या संपात फूट, परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या संघटनांची माघार
राज्यात पुणे, मुंबई आणि नवीमुंबई या महानगरात विविध मागण्यासाठी ओला-उबर आणि रेपिडो बाईक टॅक्सी चालकांचा संप सुरु आहे, आज काही संघटनांनी या संपातून माघार घेतली आहे.

मोबाईल एपवरुन संचालित होणाऱ्या ओला-उबर आणि रेपिडो बाईक टॅक्सी यांच्या संपात फूट पडली आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर यासह प्रमुख शहरांमध्ये ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या चालकांचा कालपासून संप सुरु आहे. याचा खूप मोठा फटका प्रवाशांना होत आहे. भांडवलदार कंपन्या मोबाइल एपद्वारे प्रवासी वाहतूक सेवा देताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. आरटीओ समितीने ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि कॅबसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दरात या कंपन्या सेवा देत असल्याचा आरोप करीत चालकांनी संप पुकारला आहे.
ओला, उबर आणि रेपिडो बाईक टॅक्सीवाल्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांना सकाळी कामाला जाताना आणि कामावरुन सायंकाळी घरी येताना ओला-उबर टॅक्सी मिळत नसल्याने प्रवाशांचे दोन दिवस प्रंचड हाल सुरु आहेत. या संपाचा सर्वात मोठा फटका नवीमुंबईत बसला आहे.राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी चालकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि सकारात्मकता दाखवत 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संपातून माघार घेतली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि काही टॅक्सी संघटनांची या संपातून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.
दादागिरीने बंदमध्ये सामील होण्यास दादागिरी
परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर काही संघटनांनी या संपातून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांचे हातावरचे पोट असल्याने. या धंद्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून असल्याने त्यांनी आपण या संपातून माघार घेत असल्याची भूमिका मांडली आहे. जर शासनासोबत योग्य पातळीवर चर्चा सुरू असताना विनाकारण आंदोलन किंवा बंद पुकारण्याची आवश्यकता नसल्याचे माघार घेतलेल्या संघटनांनी म्हटले आहे. रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांना जबरदस्तीने किंवा दादागिरीने बंदमध्ये सामील होण्यास काही संघटना भाग पाडत असल्याचे या संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. अशांवर पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी यावेळी या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केली आहे.
