स्थानिक स्वराज संस्थेत भाजपा पाठोपाठ शिंदे सेनेचा स्वबळाचा नारा, नांदेडमध्ये कुणाचा होणार ‘खेला’
Nanded Local Body Election Uday Samant : नांदेडमध्ये सत्तेचे गणित पूर्णपणे बदलून गेले आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी पक्षात पक्षांतर झाले. विधानसभा, लोकसभेत धक्के बसले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेत उट्टे काढण्याची भाषा सुरू झाली आहे.

राज्यात दोन पक्ष फुटले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये अनेक जण आलेत. लोकसभा महाविकास आघाडीने तर विधानसभा महायुतीने गाजवली. पण या दरम्यान अनेक अंडरकरंट बसले. नांदेड जिल्हा पण त्याला अपवाद नाही. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपवाशी झालेत. तर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अजितदादांची राष्ट्रवादी जवळ केली. त्यानंतर विधानसभेत सुद्धा महायुतीत असताना माजी नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे.
नरेंद्र मोदींच्या महामंत्राकडे पाठ
लोकसभा, विधानसभेत भाजपाने निवडणुकीचे सूत्र हाती घेतली होती. तीनही पक्षात ताळमेळ दिसत होता. तीनही पक्षातील नेत्यांनी एकदिलाने काम केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीमधील सर्व मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. त्यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा, लोकसभेप्रमाणे पुढील पाच वर्षातील निवडणुकीत एक दिलाने काम करण्याचा मोलाचा सल्ला दिला होता. पण नांदेडमध्ये भाजपाने सर्वात अगोदर स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर शिंदे गटाने पण जशाच तसे उत्तर देत स्वबळाचा नारा दिला.
जिल्ह्यात भाजप मजबूत
नांदेड जिल्ह्यात भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी त्याचा उल्लेख करत स्वबळाचा हुंकार भरला होता. जिल्ह्यात भाजपचे नऊ पैकी पाच आमदार आहेत. संघटन मजबूत झाले आहे. त्यामुळे चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत एकहाती विजयाचा आशावाद नोंदवला होता.
हेमंत पाटील यांचे जशास तसे उत्तर
तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांच्या स्वबळाच्या भाषेचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. अशोक चव्हाण म्हणजे भाजपा नव्हे असे ते म्हणाले होते. तर चव्हाण हे युती धर्म विसरल्याची टीका सुद्धा त्यांनी केली होती. याविषयीची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले होते. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी सुद्धा स्वबळाची भाषा केली होती.
आता उदय सामंत यांचाही स्वबळाचा नारा
तर अशोक चव्हाण यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांची पण प्रतिक्रिया आली आहे. महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे, पण स्थानिक लेवलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असे मत त्यांनी मांडले. त्यामुळे नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सर्वच पक्षांनी शड्डू ठोकल्याचे दिसून येत आहे. आता या वाटमारीत कुणाचा खेला होणार हे लवकरच समोर येईल.
