Kolhapur: कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात, घडामोड काय?

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूरातील राजकारण नवीन वळणावर आले आहे. राजर्षी शाहू आघाडी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा होत आहे. काय आहे ही राजकीय घडामोड?

Kolhapur: कोल्हापूरात तिसरी आघाडी मैदानात; महापालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडी रिंगणात, घडामोड काय?
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तिसरी आघाडी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 8:47 AM

Rajarshi Shahu Third Front: कोल्हापूरात विलक्षण राजकीय घडामोड घडल्या. काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेस आणि वंचित सोबत येत असली तरी कोल्हापूरात मात्र वंचितने इतर पक्षांसोबत मिळून मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मैदानात या राजकीय डावपेचाची जोरदार चर्चा सुरू आहे. जागा वाटपात समाधानकारक जागा न सुटल्याने आता तिसरी आघाडी महापालिका निवडणुकीत उतरली आहे. 81 जागांवर या तिसऱ्या आघाडीने शड्डू ठोकले आहे. त्यामुळे काँग्रेससमोर मित्रपक्षांचेच आव्हान उभं ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहे ही अपडेट?

राजर्षी शाहू आघाडी निवडणुकीच्या मैदानात

आगामी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), आम आदमी पार्टी तसेच इतर घटक पक्षांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू आघाडी स्थापन करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येत या आघाडीने निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीच्या बैठकीत जागावाटपाचाही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, वंचित बहुजन आघाडीला 31 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ला 25 जागा आणि आम आदमी पार्टीला 25 जागा देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन,नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्य या मुद्द्यांवर ‘राजर्षी शाहू आघाडी’ ठोस पर्याय देईल. सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय ठेवून प्रभावी प्रचार राबवण्यात येणार असून, मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सकारात्मक राजकारणावर भर दिला जाईल.

आज पहिली यादी होणार प्रसिद्ध

आज पहिल्या यादीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी सात उमेदवार या प्रमाणे 21 जागांची यादी त्या-त्या पक्षांकडून प्रसिद्ध करण्यात येईल. ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या स्थापनेमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत चुरस वाढली असून, येत्या काळात आघाडीचा प्रचार आणि उमेदवारांची घोषणा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.