सोलापूर: हॉटेलचं बिल दिलं नाही म्हणून एका हॉटेल मालकाने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांचा ताफा अडवला होता. त्यामुळे सदाभाऊ खोत प्रचंड संतापले आहेत. खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला आणि या हॉटेल मालकाचा काहीच संबंध नसल्याचा दावा केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (ncp) नेते आपल्याला सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्याची तक्रार गृहमंत्री, मुख्यमंत्री त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे करणार आहे. राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठीशी घालत असून असले कुभांड रचून आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.