…तर वाल्मिक कराडलाही माफ करावे, जितेंद्र आव्हाडांकडून सुरेश धस यांचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट
भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केली आणि हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला. आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेली दहा लाखांची मदत सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी नाकारली होती. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार होता. मात्र हा लाँग मार्च मुंबईत पोहचण्यापूर्वीच भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी केली आणि हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला. आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन दोन ट्वीट केले आहे. या दोन्ही ट्वीटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेला लाँग मार्चबद्दल काही प्रश्न केले आहेत. तसेच एका ट्वीटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी काही सवाल केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट
“परभणी लाँग मार्च का थांबला,… १७ जानेवारी २०२५ रोजी परभणी शहरातून तब्बल ४०० किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. विशेष दुत ह्यांनीं जाणीव पूर्वक हा लॉंग मार्च चिरडला. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, हा प्रश्न धसास लावणार दलाल कोण ?” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
परभणी लाँग मार्च का थांबला,… १७ जानेवारी २०२५ रोजी परभणी शहरातून तब्बल ४०० किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. विशेष दुत ह्यांनीं जाणीव पूर्वक हा लॉंग मार्च चिरडला सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे हा प्रश्न धसास लावणार दलाल कोण ?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
“…तर वाल्मिक कराडलाही माफ करावे”, जितेंद्र आव्हाडांचा टोला
“दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा ज्याचा – त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही माफ करावे.
सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे… अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही”, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.
दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्याने येऊन, “जाऊ द्या, त्याला माफ करा”, हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात, हा… pic.twitter.com/zGStERc998
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
