परळीत सत्तापालट होणार, माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
आगामी परळी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षात प्रवेश केला.

आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि परळी नगरपरिषदेतील काही माजी नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशावेळी बीड लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी परळीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचार आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला.
खासदार बजरंग सोनावणे यांनी या पक्षप्रवेशावेळी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता कडवट टीका केली. तसेच आगामी निवडणुकीत परळीची सत्ता पलटवण्याचा निर्धार व्यक्त केला. आज शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही या नगरपरिषद निवडणुकीत परळीची सत्ता उलटवून टाकू,” असा विश्वास बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत चूक झाली हे मान्य करत त्यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. दिवा विझताना मोठा दिसत. परळी हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या विचारांवर चालणारे घर आहे. पवार साहेब सर्व जाती-धर्मांना घेऊन चालणारे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी (मविआ) चा धर्म पाळणार आहोत आणि एकत्र लढणार आहोत. आता कुणाची किती ताकद आहे हे कळेल, असा इशारा बजरंग सोनावणे यांनी दिला.
सगळ्या फाईल नगरपरिषदेतून गायब
यावेळी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी त्यांच्या प्रवेशामागील कारणही सांगितली. यावेळी त्यांनी परळी नगरपरिषदेतील भ्रष्टाचार आणि राजकीय अडवणुकीवर थेट आरोप केले. नगराध्यक्ष म्हणून आम्हाला धनंजय मुंडे यांनी काम करू दिले नाही. परळीत सगळे अर्धवट कामे झाली आहे. आत्तापर्यंत जेवढी करोडो रुपयांची टेंडर काढली, त्या सगळ्या फाईल नगरपरिषदेतून गायब आहेत. त्यामुळेच हजारो कोटींची कामे अर्धवट आहेत. आमच्या परळीमध्ये नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे,” असा थेट आरोप दीपक देशमुख यांनी केला आहे.
प्रत्येक बुथवर आम्ही राहणार
बोगस मतदान आणि भ्रष्टाचाराचे पुरावे व तक्रार आम्ही अजित पवारांना दिले होती. त्याला कंटाळून आम्ही इकडे आलो आहोत. मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील सगळे सीसीटीव्ही काढून टाकले होते आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जाऊन बोगस मतदान केलं आहे. आम्ही यापुढे बोगस मतदान होऊ देणार नाही. प्रत्येक बुथवर आम्ही राहणार, अशी जाहीर भूमिका दीपक देशमुख यांनी स्पष्ट केली.
दरम्यान या पक्षप्रवेशामुळे परळीच्या नगरपरिषद निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार अधिक ताकदीने रिंगणात उतरणार असून, सत्ताधारी गटाला तगडे आव्हान उभे राहणार आहे.
