Prada चं नाव मोठं लक्षण खोटं; इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलची नक्कल, संतापले भारतीय
कोल्हापुरी चप्पल जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु याच चप्पलेची नक्कल एका जगविख्यात फॅशन ब्रँडने केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कुठलंही श्रेयसुद्धा दिलं नाही. यावरून भारतीय Prada वर संतापले आहेत. सांस्कृतिक अपहार ही गंभीर बाब असल्याचं अनेकांनी म्हटलंय.

साहित्य, कला, फॅशन यांसारख्या बाबींमध्ये नियमबाह्य नक्कल करणं हा थेट गुन्हाच ठरतो. प्रत्येक कलावंत आपल्या प्रतिभेच्या, कल्पकतेच्या जोरावर एखाद्या कलाकृतीची निर्मिती करतो. त्यात त्याची मेहनत, जिद्द, कला, विचार ओतलेले असतात. परंतु तीच गोष्ट जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून सरसकट कॉपी किंवा त्याची नक्कल केली जाते, तेव्हा मात्र ते नैतिकदृष्ट्याही चुकीचं मानलं जातं. अशीच नक्कल जगविख्यात लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने (Prada) केली आहे आणि सध्या जगभरात त्याचीच चर्चा होत आहे. शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक असलेल्या ‘कोल्हापुरी चप्पल’ची नक्कल ‘प्राडा’ या ब्रँडने केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात जी कोल्हापुरी चप्पल जास्तीत जास्त हजार रुपयांना मिळते, तशीच चप्पल ‘प्राडा’कडून त्यांच्या ब्रँडच्या नावाखाली लाखो रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलच्या डिझाइनची चोरी आणि त्यावर लावलेली अवाजवी किंमत.. अशा दोन्ही कारणांमुळे सध्या ‘प्राडा’ हा ब्रँड वादात सापडला आहे. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘प्राडा’ने डिझाइन कॉपी करताना कोल्हापुरी चप्पल किंवा तिथल्या कारागिरांचा कोणताही उल्लेख केला नाही. कोल्हापुरीची अस्सल ओळख...