20 वर्ष राज ठाकरेंची आठवण झाली नाही अन् आता…, भाजपच्या नेत्याचे उद्धव ठाकरेंना खडेबोल
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये युती होऊ शकते अशी जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची मागणी होती, याविरोधात मनसेकडून मोठं आंदोलन उभं करण्यात आलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर राज्यातून विरोध वाढत असल्यामुळे सरकारने त्रीभाषेसंदर्भात काढलेले दोन्ही जीआर मागे घेतले.
सरकारने जीआर मागे घेतल्यानंतर पाच जुलै रोजी मुंबई विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे, यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर?
राजकारणात युती आघाड्या होत असतात, अनेक पक्ष एकत्र येतात, त्यामुळे आम्हाला काही पोटसुळ व्हायचे काही कारण नाही, मला वाटत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल, कारण उद्धव ठाकरे विचारसरणी सोडून काँग्रेससोबत गेले, बाळासाहेबांनी शेवटपर्यंत काँग्रेस चा विरोध केला, त्यामुळे राज ठाकरे युती करतील असे वाटत नाही. आणि झाली तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे ब्रँड हा बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता. नंतर काँग्रेस बरोबर गेल्यावर बँड कसा वाजला हे महाराष्ट्राने बघितले आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा हिंदुत्ववादी ब्रँड एकनाथ शिंदे साहेब घेऊन गेले. उद्धव ठाकरे आता थेट फोन करतात, 20 वर्षे राज ठाकरेंची आठवण झाली नाही, आता मजबुरी म्हणून राज ठाकरे यांच्यासाठी पायघड्या घालतात, पण 20 वर्षे राज ठाकरे यांनी हात पुढे केला, असंही यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी यावेळी जोरदार निशाणा साधला.
