AAP Protest : जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा, जीएसटी आणि महागाईच्या विरोधात पुण्यात आप आक्रमक; केंद्र-राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
पुण्यातील आपच्या कार्यकर्ते महागाई आणि जीएसटीविरोधात रस्त्यावर उतरले होते. अशीच महागाई होत राहिली तर श्रीलंकेसारखी आपलीही परिस्थिती होईल, असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

पुणे : वीज दरवाढ, महागाई, इंधन दरवाढ, जीवनावश्यक खाद्यान्नावर जीएसटी (GST) या विरोधात आम आदमीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच या जीवनावश्यक वस्तू, सुविधा सामान्यांच्या जगण्यातून हद्दपार होण्याची स्थिती येऊन ठेपली आहे. याविरोधात आज कॅम्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा (Funeral) काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विशेषकरून जीएसटीच्या विरोधात हे पुण्यात आपच्या (Aam Aadmi party) वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. पुण्यात या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली. जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्राच यानिमित्ताने आपच्या आंदोलनकर्त्यांनी काढली. केंद्र तसेच राज्या सरकारच्या विरोधात यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड
सरकारने खाद्यान्न आणि जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आधीच जनता महागाईने बेजार झाली आहे. घरगुची गॅसचे सिलिंडर नुकतेच 50 रुपयांनी वाढवण्यात आले. पेट्रोल-डिझेल आणि आता सीएनजीदेखील रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यात सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. त्याला विरोध म्हणून पुण्यातील आपच्या कार्यकर्ते महागाई आणि जीएसटीविरोधात रस्त्यावर उतरले होते. अशीच महागाई होत राहिली तर श्रीलंकेसारखी आपलीही परिस्थिती होईल, असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. तर मोदी हाय हायच्या घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या.
यमदुताने वेधले लक्ष
अत्यंयात्रा तर यावेळी काढण्यात आलीच. पण आंदोलनात यमाचे कपडे परिधान करून काही कार्यकर्ते आले होते. त्यांनी ही पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. जीएसटी लवकर रद्द नाही केला तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनात केंद्र सरकारसोबतच राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. पुणे शहरातील रस्ते पावसाळ्यात जलमय होतात. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने अर्धवट कामे केल्याचा ठपकाही आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
