कृषी संस्कृती | देशी गाईचे अनोखे डोहाळे जेवण, परिसरात ठरला चर्चेचा विषय
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले.
सांगली : हौसेला मोल नसते. मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराजा आपल्या परिवाराची नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. कृषी संस्कृतीचा (farmer and agriculture) महत्वाचा घटक असलेल्या गाईचे डोहाळे जेवण शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले. हजार लोकांच्या पगंती बसल्या. गाईला (dohale jevan) पंचारतीने ओवाळण्यात आले. महिलांनी तिला गोग्रास भरवला अन् ओटीपूजन केले. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदीस्त करण्यात आले. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला परिसरात चांगलीच चर्चा आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील शेतकरी किरण लालासो यादव यांनी आपल्या आनंदी गाईचे डोहाळ जेवण थाटामाटात केले. या अनोख्या डोहाळ जेवणासाठी संपूर्ण गावासह पै पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. थाटामाटात झालेले गाईचे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.
खिलार प्रजातीची गाय
खिलार प्रजातीच्या गायींची संख्या वाढवण्यासाठी अनेक शेतकरी आणि गोप्रेमी प्रयत्न करीत आहेत. कडेपूर येथील किरण यादव यांच्या घरात पूर्वापार देशी गाईंचे पालन केले जाते. त्यांनी गेल्या वर्षी एक नवीन गाय खरेदी केली. आनंदाने तिचे नाव आनंदी ठेवले. आनंदी शेतकऱ्याच्या दारातील समृद्धीचे प्रतीक ठरली. गाईचे डोहाळ जेवण मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय यादव कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार डोहाळ जेवणाचे आयोजन केले होते.
गाईला सजवले
डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले. गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला. तसेच आनंदीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचे फलकही गावात झळकले.
गाईसाठी हिरवा-सुका चारा
आनंदी गाईसाठी हिरव्या-सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांनी डोहाळ जेवणाची रंगत वाढवली. महिलांनी गाईला पंचारतीने ओवाळून पूजन केले. अनेकांनी तिला गोग्रास भरवला. तिचे ओटीपूजन झाले. फोटोसेशनही झाले. कृषी संस्कृती आणि देशी गायीबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाला कडेपूरसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली.
पगंती अन् कीर्तनही
डोहाळे जेवणासाठी एक हजाराहून जास्त लोकांच्या पंगती उठल्या. कृषी संस्कृतीतील देशी गाईचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी रात्री कीर्तनाचेही आयोजन केले होते. हे अनोखे डोहाळ जेवण कडेपूर पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले.