‘ससून’मध्ये अजून 300 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार, अजित पवार परिस्थितीचा आढावा घेणार

ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत.

'ससून'मध्ये अजून 300 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार, अजित पवार परिस्थितीचा आढावा घेणार
ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी अजून 300 बेड उपलब्ध होणार

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पुण्यातील रुग्णालयात बेड्सची मोठी कमतरता भासत आहे. अशावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयात अजून 300 बेड कोविड रुग्णांसाठी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ससूनमधील कोरोना रुग्णांसाठीच्या बेड्सची संख्या 500 वरुन 800 वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (300 beds available for Corona patients in Sassoon Hospital)

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज ससून रुग्णालयातील आरोग्यसेवेचा आढावा घेतला. ससूनमध्ये सध्या कोविडसाठी फक्त 526 बेड्स होते. आता 300 नवे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात येणार आहेत. तशी माहिती डॉ. तांबे यांनी दिलीय.

30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त

दुसरीकडे पुणे जिल्हा प्रशासनाला 30 हजार अँटिजन टेस्ट किट प्राप्त झाल्या आहेत. पुढील 3 दिवसांत ग्रामीण भागात कोरोना चाचण्या करण्यासाठी हे किट मागवण्यात आले होते. जिल्ह्यातील 234 हॉटस्पॉटमध्ये या चाचण्या केल्या जाणार आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोना स्थिती अधित चिंताजनक बनत चालली आहे. अशावेळी ट्रेसिंग आणि टेस्टिंगची गती वाढवण्यासाठी प्रशासनानं या किट मागवल्या होत्या, तशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

पालकमंत्री अजित पवार उद्या आढावा बैठक घेणार

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या घेणार आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हीरची कमतरता जाणवत आहे. राज्य सरकार पुण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नुकताच केलाय. अशावेळी अजित पवार कोरोना स्थितीचा आढावा घेऊन काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महापौरांचा आरोप काय?

राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय. पुणे शहरात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करतोय. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. पुणे शहराला रेमडेसिव्हीर मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही त्याला पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

Video : पुण्यात लॉकडाऊनचं सर्कुलर पोहोचतं पण मोफत शिवभोजन थाळीचं नाही? पहा काय घडतंय?

पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश बंदी, महापालिकेचे आदेश

300 beds available for Corona patients in Sassoon Hospital

Published On - 5:35 pm, Thu, 15 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI