Pune News : पाच एकर शेती फुकली, मग लाडक्या बहिणीच्या घरावर दरोडा; कमाईचा शॉर्टकट भोवला, जुगारी भावाला बेड्या
Pimpri Chinchwad News : बीड जिल्ह्यातील भावाने पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या सख्ख्या बहिणीच्या घरीच चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गावाकडील पाच एकर जमीन जुगारात हारल्यानंतर त्याने लाडक्या बहिणीला सुद्धा फसवले. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील भावाने त्याच्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरी केल्याचे उघड झाले. या घटनेने बहिणीला मोठा धक्का बसला. या भावाला जुगाराचे व्यसन आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेती जुगारात घालवली, आणखी पैशांची गरज पडली म्हणून सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी केली श्रीकांत दशरथ पांगरे असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याल ऑनलाईन जुगाराचे व्यसन आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.
श्रीकांत पांगरे हा मुळचा गेवराई तालुक्यातील कुंभे जळगाव येथील रहिवाशी आहे. त्याला ऑनलाईन जुगाराचे व्यसन लागले. त्यात पाच एकर जमीन विकावी लागली. त्यानंतर तो पुण्यात डिलव्हरी बॉय म्हणून काम करू लागला. पण त्याचे ऑनलाईन जुगाराचे व्यसन संपले नाही. जुगार खेळून हरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने आणखी जुगार खेळण्यास सुरुवात केली. तिथे पैसे कमी पडू लागले म्हणून त्याने चक्क सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी केली.
चोरी केली, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात




13 जानेवारी वाल्हेकरवाडी येथील हाऊसिंग सोसायटीत चोरी झाली. या प्रकरणात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व पाहणी केली. घरात सर्वच गोष्टी जागच्या जागी होत्या. कुठेही तोडफोड नव्हती. दरवाज्याचे कुलूप-कोंडे व्यवस्थित होते. दुपारच्या वेळी गुपचूप घरात येऊन कोणी चोरी करण्याची शक्यता दिसत नव्हती. मग पोलिसांनी घरातील सदस्यांची कसून चौकशी केली.
चोर घरातीलच असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. तेव्हा श्रीकांत पांगरे याची कुंडली निघाली. त्याला ऑनलाईन जुगाराचे व्यसन असल्याचे तपासात समोर आले. श्रीकांत याला पण पोलीस आपल्याला पकडू शकतात याची शक्यता वाटत होती. त्यामुळे तो गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याने सख्ख्या बहिणीच्या घरातून 1 लाख 37 हजार रुपयांचे साडेबारा तोळे सोने चोरले होते. विशेष म्हणजे बहिणीसोबत तो तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पण गेला होता.