Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
वैष्णवी यांचा मृत्यू प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणात आपला काही संबंध नाही, असे अजित पवार यांनी बारामती विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Vaishnavi Hagawane Death Case Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आपला या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. बारामती विमानतळ माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, मी फक्त लग्नाला उपस्थित होतो. माझा काही संबंध नाही. नालायक माणसे माझ्या पक्षात नको. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातील लोकांनी चूक केली तर माझा काय संबंध आहे. फरार असलेल्या हगवणे यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके वाढवली आहे. आता कुणाच्या लग्नाला गेलो तर अशी आफत येते. त्यामुळे कुणी लग्नाला नाही आले तर नाराज होऊ नये.
वैष्णवी आणि शशांक यांचे लव्ह मॅरेज होते. वैष्णवीच्या हट्टामुळे हे लग्न थाटामाटात झाले होते. या लग्नासाठी शंशाक याच्याकडून फॉर्च्यूनर गाडीचा मागणी झाली होती. तसेच सोन्याची मागणी देखील झाली होती. एक लाख 20 हजाराचे घड्याळ मागितले होते. लग्नात फॉर्च्यूनर गाडी अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, राजाभाऊंनी तुमच्याकडे गाडी मागितली की, तुम्ही दिली, अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली.
या प्रकरणाबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या, राजकीय नेत्यांना लग्नात बोलवले जाते. अनेक लग्नात राजकीय पदाधिकारी जात असतात. त्याच पद्धतीने अजित पवार यांना बोलवले गेले होते. परंतु त्या प्रकरणाशी अजित पवार यांचा काहीच संबंध नाही. या प्रकरणात अजित पवार पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नाही, असे रुपाली ठोंबर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या होत्या, हुंड्यात देण्यात आलेली फॉर्च्यूनर गाडी हगवणे कुटुंबाला देताना आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात हे विसरला होतात का? असा प्रश्न शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला होता.