..आणि नेहमी शांत असणारे दत्तामामा भडकले! कारण काय?

रविवारी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यासाठी ते उपजिल्हा रुग्णालयात आले होते.

..आणि नेहमी शांत असणारे दत्तामामा भडकले! कारण काय?
दत्तात्रय भरणे, पालकमंत्री, सोलापूर

इंदापूर : शांत, संयमी, संवेदनशील आणि साधेपणा, राज्य मंत्रीमंडळात अशी ओळख असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे रविवारी मात्र भडकलेले पाहायला मिळाले. रविवारी इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यासाठी ते उपजिल्हा रुग्णालयात आले होते. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात अपुरा प्रकाश होता. त्यामुळे भरणे यांनी लाईट लावण्यास सांगितलं. एवढा मोठा कार्यक्रम असताना, लहान मुलांना लस दिली जात असताना लाईट का लावली जात नाही? यासाठी सांगावं लागतं का? असा सवाल भरणे यांनी केला.(Dattatraya Bharane was angry at the sub-district hospital)

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी देशभरात पार पडत आहे. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात अंधार असल्यामुळे दत्तात्रय भरणे संतापले. पण लगेच पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे वातावरणही हलकं होण्यास मदत झाली.

जेव्हा दत्तामामा रस्त्यावर चहा घेतात!

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री असलेले दत्तात्रय भरणे आपल्या साधेपणामुळे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. चार दिवसांपूर्वीच इंदापुरातील त्यांच्या साधेपणाच्या एका कृतीची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. एरवी मंत्री म्हटलं की प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफ़ा आणि त्यातून सर्व सामान्य कार्यकर्त्यांची होणारी अवहेलना असे सर्वसाधारण चित्र पाहायला मिळते. परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सर्व गोष्टींचा बडेजाव न करता आज इंदापुरात रस्त्यावरच चहा घेत मंत्री झाल्यानंतर देखील आपला साधेपणा कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

रागाच्या भरात महिलेने पकडली दत्ता भरणेंची कॉलर

गेल्या महिन्यात एका महिलेने रागात येऊन भरणे यांचा शर्ट पकडीत जाब विचारल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र, तेव्हादेखील दत्तात्रय भरणे यांनी शांतपणे हा प्रसंग हाताळला होता. तो व्हीडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

दत्तामामा फोटो ग्राफरही बनले!

14 डिसेंबर रोजी दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही तरुणही मरीन ड्राईव्हवर जमले होते. इकडे तरुण गप्पांमध्ये दंग होते आणि भरणेंचं लक्ष चालण्याकडे होतं. यावेळी अचानक काही तरुणांनी “ओ काका आमचा एक फोटो काढा की,” असे म्हणत, थेट दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली.

एरव्ही तरुण मंडळी वेगवेगळ्या नेत्यांसोबत फोटो काढण्यासाठी धडपडत असतात. मात्र, थेट तरुणांनीच थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली. बरं एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर भरणे यांच्या हातात मोबाईल देत तरुणंडळी फोटोसेशनसाठी रेडीही झाले. यावेळी भरणे यांनी कुठलेही आढेवेढे न घेता तरुणांचे अनेक फोटो काढले. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चक्क फोटोग्राफर झाले. यावेळी भरणे यांनी तरुणांसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यानंतर मुलांनीही भरणे यांच्यासोबत अनेक फोटो काढत हा प्रसंग काळाच्या स्मृतीवर कैद केला.

…आणि भरला 100 रुपये दंड

यावेळी इंदापुरात कार्यक्रमात भाषण करत असताना त्यांनी लावलेला मास्क अचानकपणे निसटला. नियमांचे उल्लघन केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्व:तहून लासुर्णे ग्रामपंचायतीकडे 100 रुपयांचा दंड भरला होता. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोनाबाबतच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. तसेच कार्यक्रमात विनामास्क आलेल्या नागरिकांना त्यांनी मास्क लावण्याच्या सूचनादेखील केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दत्तामामा म्हणाले ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शर्ट पकडून महिलेने विचारला जाब

Dattatraya Bharane was angry at the sub-district hospital

Published On - 4:59 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI