‘लिनेन बॉय’ बनले टीटीई? विनातिकीट प्रवाशांकडून पैसे घेऊन दिले बर्थ, असा उघड झाला प्रकार
भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय यांना पकडण्यात आले.

रेल्वे प्रवास करताना कन्फर्म तिकीट न मिळण्याचा अनुभव अनेकदा प्रवाशांना येतो. त्यावेळी वेगवेगळे प्रकार वापरुन बर्थ मिळवण्याचा प्रयत्न प्रवासी करतात. कामाख्या एक्स्प्रेसमध्ये बेकायदेशीर बर्थ देण्याचा प्रकार उघड झाला आहे. वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बलाने हा प्रकार उघड केला. या प्रकरणामध्ये सात ‘लिनेन बॉय’ला अटक करण्यात आली आहे. तसेच पथकाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल केले.
भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय (चादर, गाद्या पुरवणारे कर्मचारी) यांना पकडण्यात आले. तपासणी मोहिमेत गाडीतील प्रवाशांना ब्लँकेट व चादर देणार्या ठेकेदारीत काम करणारे लिनेन बॉय प्रवाशांकडून पैसे घेत होते. त्यानंतर त्यांना एसीच्या डब्यात बसवून प्रवास करू देत होते. रेल्वेत विनातिकीट प्रवाशांकडून काही लिनेन बॉय हे पैसे वसूल करीत होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हे लिनेन बॉयच तोतया असल्याचे आढळून आले. शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत.
१३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल
तिकीट तपासणी मोहिमेत १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल करण्यात आले. वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या पथकाने ट्रेन क्र. १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या (एलटीटी-कामाख्या) एसी एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ स्थानकादरम्यान अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली होती.
मुंबईत काही दिवसांपूर्वी व्हीआयपी कोटाच्या माध्यमातून तिकीट विक्रीचा प्रकार उघड झाला होता. रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने बनावट सही आणि शिक्के वापरत व्हीआयपी कोट्यातून तिकिटे प्रवाशांना दिली होती. त्या बदल्यात प्रवाशांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर ाता कामाख्या एक्स्प्रेसमध्ये लिनेन बॉयकडून हा प्रकार उघड झाला.
