राज ठाकरे संजय राऊत यांच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेप्रमुखांनी काय दिला सल्ला?
आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली, राज ठाकरे यांनी यावेळी राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे, संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचापूस केली आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी गेले आहेत. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर आज राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीसंदर्भात सुनील राऊत यांनी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले सुनील राऊत?
राऊत साहेबर आजारी आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, राज ठाकरे हे सतत फोनद्वारे माझ्या संपर्कात होते. ते सतत संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. त्यांच्यावर कोणते उपचार सुरू आहेत, त्यांना युएसला नेलं पाहिजे का? अशी चैकशी ते संजय राऊत यांच्यासंदर्भात नेहमीच माझ्याकडे करत होते. दरम्यान त्यानंतर आता राज ठाकरे हे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते, त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसचे त्यांनी संजय राऊत यांना सल्ला देखील दिला की, ज्या पद्धतीचा तुमचा आजार आहे, ते पहाता आता तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. लोकांमध्ये न मिसळता आणखी दीड महिने आराम करा आणि त्यानंतर मग तुम्ही जनतेमध्ये या, असा सल्ला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला आहे, अशी माहिती यावेळी सुनील राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे साधारणपणे वीस वर्षांनी संजय राऊत यांच्या घरी आले, मात्र आता बराच बदल झाल्यानं राज ठाकरे रस्त्यांच्या संदर्भात कन्फूज होते. आम्हालाही उत्सुकता होती, राज ठाकरे आमच्या घरी आले, त्यामुळे आम्हीही आनंदी आहोत, असं यावेळी सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.
