कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा रोखठोक इशारा
कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा राज ठाकरे यांनी आजच्या सभेतून दिला आहे, त्यांनी यावेळी हिंदीच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा बोलणार नाही, अशी मुजोरी दाखवणाऱ्यांना मनसेनं चांगलाच दणका दिला, त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर मनसेनं देखील मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला, या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला, मोठ्या संख्येनं लोकं या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा सुरू आहे. या सभेतून पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राहून मराठी न बोलणाऱ्या लोकांना थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, साधा छोटा प्रसंग होता. मोर्चाला जमलेले महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले होते, त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढता, मनसे सैनिकांनी सांगितलं की, हिंदी सक्तीविरोधात मोर्चा सुरू आहे, त्यानंतर तो म्हणाला की इथे हिंदीच बोलतात. त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफटात बसली. मग व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. तुमच्या कानाखाली मारली होती का? अजून नाही मारली, विषय समजून न घेता, काय झालं माहीत नसताना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन बंद पुकारता, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही का इथे. दुकानं बंद करून किती दिवस राहणार? आम्ही काही घेतलं तर दुकानं सुरू राहतील, महाराष्ट्रात राहाताय शातं पणे राहा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहेत, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे, ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली? कोण दबाव टाकतं तुमच्यावर? केंद्राचं हे धोरण पूर्वीपासूनचं आहे, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
