खेड तालुक्यातील विष्णू भगत, लिंबं…, कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट
रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले, असं कदम यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा ते धावत आले होते. आम्ही सोंगाड्या नाव दिलं आहे. खेड तालुक्यातील विष्णू भगत यांच्या घरी लिंबू घेऊन तुमच्या घरातील महिला गेली होती की नाही ते सांगा? आज तुम्ही फक्त 1100 मतानं निवडून आला आहात, तुम्ही पडणार आहात. 2009 ला तुम्ही नाही तर मला उद्धव ठाकरे यांनी पाडलं असा हल्लाबोल कदम यांनी केला आहे.
दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ही आंदोलनाची सुरूवात असेल. सक्ती असेल तर तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, भाषिक आणीबाणी आहे. सक्ती स्विकारणार नाही. मला वाटत राज ठाकरे यांची भूमिका पहिल्यापासून आहे, पण आता सर्व बाकीचे उतरत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.
भास्कर जाधव यांनी काय केला होता आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप केला होता, 2009 ची निवडणूक जिंकण्यासाठी कदम यांनी अघोरी पूजा केली होती, असा गौप्यस्फोट जाधव यांनी केला होता, त्यानंतर आता कदम यांच्याकडून देखील या आरोपांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.
