Phulmbari:जादूटोण्यामुळे पराभव झाला हो! फुलंब्रीत शिवसेना उमेदवाराच्या अजब दाव्याने एकच खळबळ, थेट पोलिसात धाव…
Chhatrapati Sambhajinagar: नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा धुराळा खाली बसला आहे. पण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. तर काही उमेदवारांनी जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा दावा केला आहे. असाच दावा फुलंब्रीतील शिवसेना उमेदवाराने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे/प्रतिनिधी: नगरपालिका आणि नगरपंचायत निकाल लागून त्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काहींना अनपेक्षितपणे यश मिळाले आहे. या निवडणुकीत आपला पराभव कसा आणि का झाला याचे मंथन हे उमेदवार करत आहेत. काही पराभूत उमेदवारांनी तर थेट त्यांच्या भागात जाऊन मतदारांचे आभारही मानले आहेत. तर काहींनी या पराभवानंतर मतदारांना शिव्यांची लाखोलीही वाहिली आहे. पण आता काही उमेदवारांनी जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा अजब दावा करून खळबळ उडवून दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुलंब्री नगरपंचायतीत शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांनी (Shivsena Amit Wahul Witchcraft Claim) जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इतक्यावरच ते थांबले नाही. तर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
फुलंब्रीच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये काय घडलं?
फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक २० डिसेंबर रोजी पार पडली. मात्र मतदानापूर्वी दोन दिवस अगोदर १८ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ९ मधील भारत माता मतदान केंद्रावर कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याची एकच चर्चा झाली होती. आता या जादूटोण्याच्या प्रकारामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उमेदवार अमित वाहुळ (Amit Wahul) यांनी केला आहे.
जादूटोण्याच्या प्रकारामुळे नागरिकांनी भीतीपोटी मतदान केले नसल्याचा आरोप पराभूत उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे. नगरपालिका निवडणुकीत पराभव झालेल्या अमित वाहुळ यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहुळ यांनी केली आहे. ग्रामीण भागात अजून ही जादूटोण्याची भीती कायम आहे. त्यामुळे त्या मतदान केंद्रात असा प्रकार घडल्याने त्याचा धक्का उमेदवारांना बसला आणि त्यातील अनेकांनी भीतीपोटी मतदानाला जाणे टाळले. अनेक मतदारांनी मतदानाचा निर्णय बदलला. हा प्रकार लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेला धक्का देणारा आणि काळिमा फासणारा असल्याचे आणि हा जादूटोण्याचा बनाव त्यासाठी केल्याचा आरोप अमित वाहुळ यांनी केला आहे.
या सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत अशा लोकांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहुळ यांनी तक्रारीत केला आहे. हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची प्रतिक्रिया पण वाहुळ यांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे लोकशाहीत विजयासाठी असाही प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मतदारांना आवाहन करण्यात यावे आणि त्यांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
