‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक

सारथी संस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (Sambhajiraje Chhatrapati on Sarthi Institute issue). सारथीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याप्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

'सारथी'चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक

पुणे : सारथी संस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे (Sambhajiraje Chhatrapati on Sarthi Institute issue). सारथीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याप्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहे. सारथी संस्थेबाबत संबंधित मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडून द्यावी, अशी मराठा समाजाची भावना आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला (Sambhajiraje Chhatrapati on Sarthi Institute issue).

सारथी संस्थेच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना घेराव घालून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर वडेट्टीवार काल (2 जुलै) पुण्यात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी “सारथी संस्था बंद पडणार नाही”, असं सांगितलं.

“काही लोक याप्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामागे कोण आहे? ते मी नंतर बोलेल”, असं वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा : आयुक्त-महापौर वाद शमेना, तुकाराम मुंढेंनी कंत्राटदाराला 18 कोटी कसे दिले? नागपूरच्या महापौरांचा सवाल

विजय वडेट्टीवारांच्या या प्रतिक्रियेनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले. त्यांनी फेसबुकवर राज्य सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. याशिवाय सारथी संस्था बंद करण्यासाठी बरेच प्रयत्ने केले गेल्याचा आरोप केला.

“सारथीचा पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, सारथीबाबत समाजाला जे पाहिजे तेच होईल. राजर्षी शाहू महाराजांच्या वंशजाच्या नात्याने समाज जागा करणं, हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे सारथीच्या स्वायत्ततेसाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी मराठा समाजाने पुन्हा एकदा एकत्र यावं”, असं आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केलं.

“मराठा समाजाने संघर्ष करुन मिळवलेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने अस्तित्वात आलेली ही संस्था आहे. याबाबत प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जाते. फक्त आश्वासनं देऊन ही संस्था बंद करायचा विचार आहे का? तर तसेही सांगा”, असं संभाजीराजेंनी ठणकावलं.

“संबंधित मंत्र्यांकडून काही प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला अपेक्षित आहेत. मराठा समाजाच्यावतीने पुण्यात आंदोलन केलं. तिथे जी आश्वासने सरकारच्यावतीने समाजाला दिली गेली त्यापैकी किती पूर्ण केली?”, असा सवाल संभीजीराजेंनी केला.

हेही वाचा : कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर

“राज्य सरकारने सारथी संस्थेची स्वायत्ता राखणार, असा शब्द दिला होता. मात्र, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? संस्थेमध्ये गैरव्यवहार केला, असा आरोप करुन संस्था बदनाम केली गेली. तिची चौकशीसुद्धा केली, त्याचे पुढे काय झाले? की तो केवळ फार्स होता? मुळात सारथी संस्था कोणत्या उद्दिष्टांसाठी अस्तित्वात आली होती? मात्र, आता कोणती उद्दिष्टे समोर आणली जात आहेत?”, असे प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केले.

“एखादी संस्था जी अस्तित्वात येऊन केवळ 1 वर्ष होतं, तिच्या पाठीमागे काही लोक एवढं हात धुवून लागतात की, तिला जर्जर अवस्थेत नेऊन ठेवलं जातं, असा आरोप संभाजीराजेंनी केला. एखाद्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हातात घेऊन उभी राहत असलेल्या संस्थेचे लगेच पंख छाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला”, असा आरोपदेखील संभाजीराजेंनी केला.

“कुणी एका अधिकाऱ्याने किंवा मंत्र्याने गैरव्यवहार केला म्हणून शासनाच्या किती मंत्रालयाना टाळे लावले? याचाही हिशोब झाला पाहिजे ना?”, असा सवालदेखील संभाजीराजेंनी केला.

“समाजाची एकी फार मोठी ताकद असते. त्यापुढे मोठमोठ्या सत्तांना झुकावं लागतं. यातूनच मराठा समाजाने, आरक्षण मिळवलं. अजूनही अनेक गोष्टी समाजाला मिळवता येतील. सारथीबाबतही मराठा समाजाला जे पाहिजे तेच होईल”, असा आशावाद संभाजीराजेंनी व्यक्त केला.

विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले होते?

सारथी संस्था चालेल. मराठा विद्यार्थ्यांच्या उद्दीष्ट्येपूर्तीसाठी ही संस्था चालेल. मात्र, काही मंडळी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय. यामागे कोण आहे? ते मी नंतर बोलेल.

सध्या शासनाकडे पैसे नाहीत. थकबाकी आहे, पैसे आम्ही मागेपुढे देत आहोत. पण स्कॉलरशिप थांबवली, बंदच केलं, अशाप्रकारे काही लोकांनी त्रागा केला. त्यामध्ये तथ्य नाही. फेलोशिप सुरु राहील. विद्यार्थ्यांचा 5 वर्षांचा कोर्स पूर्ण होईल.
500 विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा दरमहा 31 हजार रुपये खर्च राज्य सरकार करत आहे. हा खर्च पाच वर्ष करायचा आहे. या फेलोशिपमध्ये पाच वर्षात 22 लाख रुपये एका विद्यार्थ्यायासाठी खर्च होणार आहे. तरीही आम्ही बंद पाडणार नाही.

सारथी सुरु राहील. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु राहील. पण त्यांच्या अॅकॅडमीचे पैसे भरताना मागेपुढे होऊ शकतं. यावर्षीदेखील अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 50 कोटींची तरतूद केली आहे.

विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

सारथी संस्थेतून कुणालाही काढलेले नाही. उलट 80 जण स्वत:हून राजीनामे देऊन सोडून गेले. त्याठिकाणी नवीन भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत.


Published On - 2:06 pm, Fri, 3 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI