प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसेंचा काटा काढला, आता पंकजा ताई… खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
पंकजा मुंडे यांनी आता काही कामे करण्याची घोषणा केली. मग एवढी वर्ष का केलं नाही. तेव्हा का गप्प बसले. निवडणुका आल्यावरच तुम्ही बोलता भाजपची रणनिती खोटे बोलण्याची आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर जत येथील प्रचारसभेत जोरदार हल्ला चढवला. भाजप नेत्या पंकजा मुंडे याच परिसरात एका सभेसाठी आल्या असताना त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर बोट ठेवत खासदार विशाल पाटील यांनी टीका केली. तसेच यावेळी विशाल पाटील यांनी भाजपच्या राजकारणावर आणि ओबीसी नेत्यांच्या स्थितीवर गंभीर आरोप केले आहेत.
खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की भाजप पक्ष हा कॉपी करणारा पक्ष आहे. पंकजा मुंडे यांनी उल्लेख केलेली लाडकी बहीण योजना ही मुळात काँग्रेस सरकारची होती, जी भाजप सरकारने नंतर सुरू केली. लाडकी बहीण योजना राहुल गांधींची होती, असा दावा विशाल पाटील यांनी केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी आता काही कामे करण्याची घोषणा केली. मग एवढी वर्ष का केलं नाही. तेव्हा का गप्प बसले. निवडणुका आल्यावरच तुम्ही बोलता भाजपची रणनिती खोटे बोलण्याची आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
पंकजा मुंडे या मंत्री पदावर राहतात की नाही
खासदार विशाल पाटील यांनी भाजपच्या एकंदर राजकारणाचा संदर्भ देत मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली. भाजपचे एकंदर राजकारण पाहता निवडणूक झाल्यावर पंकजा मुंडे या मंत्री पदावर राहतात की नाही कोणाला माहिती नाही,” असे विधान खासदार विशाल पाटील यांनी केले. पंकजा मुंडे यांनी मला शब्द दिला असला तरी, भाजपच्या धोरणांवर विश्वास नाही, असे ते म्हणाले.
त्यांना दुसरे चालत नाहीत
ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या भूमिकेवर बोलताना विशाल पाटील यांनी गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख करत भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची कशी अवस्था झाली याबद्दल विधान केले. मुंडेंची अवस्था काय केली हे आपल्याला माहिती आहे. एकनाथ खडसे, मुंडे, महाजनांचं काय झालं. यांची नाव तरी तुम्ही ऐकली का. पूर्वी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे ही सर्व नावं कुठे गेली. या सर्वांचा काटा काढून बाजूला काढून टाकण्यात आले आहे,” असा आरोप त्यांनी केला. हे ओबीसी ओबीसी फक्त म्हणायला आहे. तिथे फक्त ठराविक विशिष्ट लोक राजकारण करतात. त्यांना दुसरे चालत नाहीत. आता त्यांना लिंगायत समाजाचे प्रेम आले आहे. पण नंतर या सर्वांना बाजूला करुन टाकलं जाणार आहे., असा दावाही विशाल पाटील यांनी केला.
