देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात डावे होते, तुमचा भाजप नव्हता; संजय राऊत यांचा खोचक टोला
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सत्तासंघर्षाची तीव्रता वाढली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, पालिका निवडणुकांच्या स्थगिती, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयापासून, पालिका निवडणुका प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाजपला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला विधीमंडळाच्या बहुमताच्या आधारावर दिले आहे. परंतु, त्यातील बरेच लोक निवडणुकीत पडले आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
डावे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होते, भाजप नव्हता
यावेळी संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “सत्तेपुढे शहाणपण नसते. अमित शाह सत्तेत बसले आहेत, म्हणून शहाणे आहेत. सत्तेत आहेत म्हणून यांचे छापले जाते. देवेंद्र फडणवीसांनी इतिहासाचा अभ्यास करावा. जगभरात डावी विचारसरणी आहे, रशिया, चीनमध्ये आहे. देवेंद्र फडणवीसांनी कॉ. श्रीपाद डांगेंचं नाव ऐकलं आहे का?” असा सवाल संजय राऊतांनी केला. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा डाव्या विचारांना मानणारे होते, ज्यांचा पुतळा मोदींनी उभारला आहे. भगतसिंग कम्युनिस्ट होता. डावे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होते, तुम्ही किंवा तुमचा भाजप नव्हता. देवेंद्र फडणवीस अभ्यास करा, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.
महाराष्ट्राचे गुंडाराष्ट्र केलंय
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ला प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचे गुंडाराष्ट्र करून टाकले आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर पीएमएलए (PMLA) कायद्यांतर्गत खोटे गुन्हे दाखल केले होते,” अशी आठवण संजय राऊतांनी करुन दिली.
निवडणूक आयोग अमित शाह चालवतात
आदित्य ठाकरे यांच्या पालिका निवडणुकांसंदर्भातील विधान योग्य आहे. “पालिका निवडणुकांचे वेळापत्रक बदलणे सुरू आहे. वरळीतील मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुका पुढे ढकलण्या संदर्भात सूचना केल्या असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला. आमचे चिन्ह एका चोराला दिले आहे, एक लफंगा आहे. त्याला पक्षातून काढून टाकले आहे, हा आहे आपला निवडणूक आयोग. तो निवडणूक आयोग अमित शाह चालवत आहेत.” असे संजय राऊत म्हणाले.
