Chhagan Bhujbal: राजकारणात मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांची वेगळी भूमिका, भाजपला टेन्शन; नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: नुकताच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी 2029च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार माहिती नाही. त्यापेक्षा आपण 288 जागांसाठी तयारी करायला हवी असं म्हटलं आहे.

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आता छगन भुजबळ यांनी नेमका काय निर्णय घेतला आहे? ते 2029च्या निवडणुकीबाबत नेमकं काय म्हणाले जाणून घ्या…
२८८ जागांवर तयारी करण्याचे आवाहन
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी आपले स्पष्ट मत मांडले. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजप) काय भूमिका घेणार, याबाबत आताच काही सांगता येणार नाही किंवा ते कोणाला माहिती नाही. त्यामुळे त्या भरवशावर न राहता, आपण आतापासूनच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी तयारी करायला हवी असे भुजबळ यांनी या बैठकीत म्हटल्याचे समजते.
मतदारसंघ वाढीवरही लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला
केवळ २८८ जागांवरच नाही, तर आगामी काळातील राजकीय आणि भौगोलिक बदलांवरही भुजबळांनी लक्ष वेधले. भविष्यात मतदारसंघांची पुनर्रचना होऊन जर मतदारसंघांची संख्या वाढत असेल, तर त्याबाबतही पक्षाने आतापासूनच ‘प्लॅनिंग’ (नियोजन) करायला हवे, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी बैठकीत केली. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांनी मांडलेल्या या आक्रमक आणि दूरदृष्टीच्या भूमिकेमुळे पक्षाच्या आगामी वाटचालीचे संकेत मिळत असून, महायुतीतील घटक पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीत तटकरेंसोबत वाद?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये मनातील खंत व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. केवळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही? असे त्यांनी म्हटले. त्यावेळी छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. मात्र, तटकरे यांनी भुजबळांच्या प्रयत्नाला न जुमानता आपले बोलणे सुरुच ठेवले. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला
