Weather Update : महाराष्ट्रावर मोठं संकट, समुद्रात हालचाली; वादळापूर्वीच नेव्ही, कोस्ट गार्ड अलर्ट मोडवर; नवी अपडेट काय?
महाराष्ट्रासह देशात पुन्हा मुसळधार पावसाचा धोका आहे. हवामान खात्याने 7 ऑक्टोबरपर्यंत 'शक्ती' वादळासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तीन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे 14 राज्यांना हाय अलर्ट जारी झाला असून, मुंबईसह किनारपट्टीवर विशेष दक्षता घेतली जात आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. आधीच नुकसानग्रस्त महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

पावसाचे चार महिने संपले असले तरी पावसाचा धोका अजून संपलेला नाही. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर धुमाकूळ घालणारा पाऊस आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात शक्ती वादळ येणार आहे. त्यामुळे राज्यात 7 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा बसणार असल्याने मुंबईच्या समुद्रात हालचाली वाढल्या आहेत. वादळ येण्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून कोस्ट गार्ड आणि नेव्ही अलर्ट मोडवर आले आहेत.
देशातील हवामानाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, देशात एकाच वेळी तीन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील तब्बल 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकाचवेळी तीन कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची ही दुर्मीळ वेळ असल्याने चिंता अधिक वाढली आहे.
या राज्यांना तडाखा
देशाच्या सागरी हद्दीत पूर्व आणि पश्चिमेकडे दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहेत. यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तर पश्चिमेला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, तसेच हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मागे पाऊस काष्ठ
महाराष्ट्रात आधीच पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान, नद्या-नाल्यांचा पूर आणि अनेक ठिकाणी घरांचे तसेच रस्त्यांचे नुकसान झालेले आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान विभागानं जोरदार पावसाचा इशारा दिल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात शक्ती वादळ
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या समुद्रात नेव्ही आणि कोस्टगार्ड अलर्ट मोडवर आले आहेत.
मच्छिमारांनो समुद्रात जायचं नाय
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुख्य म्हणजे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
